जिलेटिनच्या स्फोटात दोघांचा मृत्यू ,एक गंभीर जखमी

Ratnakar Ashok Patil
Published:

२२ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : विहिरीत काम करीत असताना मजूर बाहेर येण्यापूर्वीच स्फोटकांचा ब्लास्ट झाल्याने दोन जण ठार तर एक गंभीर जखमी असल्याची माहिती कर्जत पोलिसांनी दिली.या प्रकाराबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कर्जत शहरालगत मेहेत्रे मळा येथे विहिरीचे काम चालू होते. मजूर विहिरीत काम करीत असताना ते वर येण्यापूर्वीच स्फोटकांचा ब्लास्ट झाला.यात तिघे जण गंभीर जखमी झाले होते.यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एकावर उपचार करण्यात येत आहेत.

याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात जखमी असलेले मिनीनाथ उद्धव चोपडे (रा. वीट ता. करमाळा जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे,विहीर मालक गणेश मेहेत्रे यांच्या विहिरीवर काम करणाऱ्या मजुरांना पुरेशी सुरक्षेची कोणतेही साधने उपलब्ध न करता मॅग्नीज मालक दत्तात्रय विक्रम जायभाय (रा. दुरगांव ता.कर्जत) याने स्वत: घटना स्थळी हजर राहून कंट्रोल ब्लास्ट करणे गरजेचे असताना तो तिथून निघून गेला.

त्यामुळे विहीर मालक गणेश मेहेत्रे व ट्रॅक्टर चालक यांना कंट्रोलचे कोणतेही प्रशिक्षण नसताना आपण स्वत: यासह विठ्ठल लक्ष्मण जाधव व मजूर संतोष कुमार हे विहिरीच्या बाहेर पडण्याआधीच ब्लास्ट ब्लास्टिंग केले.यात विठ्ठल लक्ष्मण जाधव (वय २७ वर्ष रा.करमाळा ता. करमाळा जि. सोलापूर) आणि संतोष कुमार ( रा. उत्तर प्रदेश) या दोघांचा दुर्दैवी अंत झाला.

चोपडे यांच्या या फिर्यादीवरून गणेश मेहेत्रे, ट्रॅक्टर चालक (नाव माहीत नाही) आणि मॅक्झिन मालक दत्तात्रय विक्रम जायभाय यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी जायभाय यांना कर्जत पोलिसांनी रात्रीच अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe