साधूच्या वेशातील दोघांनी महिलेचे दागिने लांबवले

Published on -

Ahmednagar News : येथील पाऊलखुणा, या चपलाच्या दुकानात असणाऱ्या आशा राजेश बोरुडे यांना साधूच्या वेशात आलेल्या दोघा जणांनी काहीतरी गुंगीचे औषध देऊन त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण व सोन्याचा हार, असे ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती अशी की, आशा राजेश बोरुडे व त्यांचा मुलगा साहिल यांचे पाऊलखुणा हे चप्पलचे दुकान आहे. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याची सुमारास दोघेजण साधूच्या वेशात दुकानासमोर आले, त्यातील एकाने दुकानात येऊन मला आशीर्वाद देण्याचे नाटक केले, मी त्याला पाच रुपये दिले.

त्यानंतर तो म्हणाला, मी तुम्हाला आशीर्वाद देतो आणि त्याने एक औषध फुंकण्यासाठी दिले, त्यानंतर माझ्या गळ्यातील दागिने मी स्वतः काढून त्याला दिले. तो निघून गेला, थोड्याच वेळात मला झालेला प्रकार समजला. मी शेजारील गायकवाड यांना तो सांगितला त्यानंतर या साधूच्या वेशात असलेल्या दोन लबाडांचा शोध घेण्यात आला. मात्र, ते सापडले नाहीत.

याबाबत बोरुडे यांनी पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये साधूच्या वेशात आलेली ठक हे कैद झाले आहेत. मात्र, त्यांचा तपास करून त्यांना अटक करण्याची जबाबदारी पोलिसांवर वाढली आहे.

दिवसा दुकानात येऊन महिलांना लुबाडण्याचा असला प्रकार पहिल्यांदाच शहरात घडला आहे. पाथर्डी शहरात कोण कोणाला कसे फसवेल, हे सांगता येत नाही, साधूच्या वेशात येऊन महिलेचे एक लाख रुपये किमतीचे दागिने चोरले आहेत. या चोरट्यांचा तपास लागावा, अशी मागणी बोरुडे यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe