Ahmednagar News : दोन दिग्गज नेते एका लग्नाला आले, ‘प्रवरे’च्या उसावरून थेट हमरी-तुमरीवरच उतरले

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दिग्गज नेत्यांची मोठी फौजच आहे. त्यात उत्तरेत तर अनेक नेते अगदी गेमचेंजर म्हणून ओळखले जातात. परंतु बऱ्याचदा हे दिग्गज समोर आले तर अनेकदा ‘पॉलिटिकल वॉर’ उद्भवतो हे अनेकदा समोर आले आहे.

आता अशाच एका विवाहसोहळ्याची चर्चा रंगली आहे. श्रीरामपूर औद्यागिक वसाहतीमधील मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी एक विवाहसोहळा होता. या विवाहसोहळ्यात माजी आमदार भानुदास मुरकुटे व भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे आमनेसामने आले.

यावेळी प्रवरा कारखाना अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून ऊस नेत असल्याबद्दल व ऊस भावावरून शाब्दीक बाचाबाची होऊन हमरी तुमरी झाली असल्याने हा चर्चेचा विषय ठरलाय.

नेमके काय घडले ?

श्रीरामपूर औद्यागिक वसाहतीमधील मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी एका लग्न सोहळ्याला माजी आमदार भानुदास मुरकुटे भेट द्यायला आले व त्या ठिकाणी पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पटारे हे देखील आले.

मंगल कार्यालयातून बाहेर पडल्यावर मुरकुटे त्यांच्या कारमध्ये बसत असताना जवळच उभ्या असणाऱ्या पटारे यांच्याकडे पाहून आपल्या परिसरातील ऊस प्रवरा परिसरात जात आहे, तो नेऊ नका असे आपल्या नेत्यांना सांगा, असे मुरकुटे यांनी बजावले.

हे ऐकताच पटारे यांनी देखील प्रतिउत्तर दिले, शेतकऱ्यांना टनामागे ३०० रुपये जादा भाव मिळत असल्याने ते प्रवरेला ऊस पाठवतात असे म्हटले. त्यावर मुरकुटे यांनी अशोक कारखान्यावर श्रीरामपूरची बाजारपेठ अवलंबून आहे.

आपला कारखाना चालला पाहिजे, त्यामुळे तुम्ही त्यांना ऊस नेऊ नका असा टोला हाणला. त्यावर पटारे यांनी मात्र राजकीय उल्लेख करत टीका करत म्हटले की, बाजार समिती तसेच इतर ठिकाणी तुम्ही त्यांच्याशी युती करतात मग तुम्हीच त्यांच्याशी बोला.

असे सुनावताच मात्र मुरकुटे संतापले व ‘आपल्या शैलीत’ पटारेंना उत्तर दिले. त्यावरून पटारेही चांगलेच संतापले. दोघांमधील शाब्दीक चकमक हमरी-तुमरी पर्यंत गेली असे उपस्थित लोक सांगतात.

त्यानंतर मुरकुटे यांना विनंती करत कार्यकर्त्यांनी गाडीत बसवले तर दुसऱ्याने पटारे यांना बाजूला नेल्याने पुढचा वाद टळला. परंतु सध्या या वादाची जोरदार चर्चा सुरु आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe