बचत गटाच्या मालाची विक्री करण्यासाठी जिल्हास्तरावर ‘ उमेद मॉल’ उभारणार : ना.विखे पाटील

Published on -

अहिल्यानगर : महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी राज्याला दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने असलेल्या अद्ययावत उमेद मॉलची जिल्हास्तरावर उभारणी करण्यात येईल, तसेच प्रत्येक तालुक्यात ‘उमेद मॉल’ची उभारणी करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय साईज्योती सरस २०२५ महिला बचतगट निर्मित खाद्यपदार्थ व वस्तुंच्या विक्री प्रदर्शनाचे ना.विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके, विनायक देशमुख आदी उपस्थित होते.

बचतगटांसाठीच्या विभागीय प्रदर्शन आयोजनाचा जिल्ह्याला पहिल्यांदाच मान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी राज्यभरात ‘उमेद मॉल’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात चार लाख महिला या बचतगटांच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत.

‘उमेद मॉल’च्या माध्यमातून बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीमध्ये एक मोठे परिवर्तन येणार आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची वर्गवारी करण्यात येऊन त्या पद्धतीचे मार्केटिंग तयार करण्यात यावे. उत्पादित मालाची ऑनलाईन विक्रीची सुविधा सुरू करण्यात आली असून यात वृद्धीसाठी प्रयत्न करावेत, यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल टाकले आहे. देशाच्या विकासातील प्रत्येक उपक्रमात महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. महिलांमध्ये असलेली उद्यमशिलता, क्रियाशक्तीला अशा प्रकारच्या उपक्रमांची साथ दिल्यास निश्चितच महिलांमध्ये अधिक प्रमाणात उर्जाशक्ती निर्माण होऊन देशाच्या विकासाला अधिक चालना मिळेल.

मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर म्हणाले, जिल्ह्यात उमेद अभियान ही एक लोकचळवळ बनते आहे. ४ लाख महिलांचा अभियानात समावेश करून घेण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये एकूण १ हजार १७४ महिला ग्रामसंघ तयार झालेले असून त्यापैकी ७५५ ग्रामसंघांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कार्यालय उपलब्ध करून देणारा अहिल्यानगर जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe