नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस ! जायकवाडीला वाहून जाणारे पाणी वाचले

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात नुकताच अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी दिलेल्या सुधारित आदेशामुळे नगर-नाशिक जिल्ह्याचे जवळपास पाऊन टीएमसी पाणी वाचले आहे. त्यात नाशिक धरणातील ४०३ दलघफु पाणी वाचले असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

सध्या अहमदनगर व नाशिकच्या धरणातून जायकवाडी धरणासाठी ८.०६ टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. परंतु नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात तसेच धरण क्षेत्रात रविवार (दि.२६) रोजी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला आहे.

त्यामुळे नदीपात्रात पाण्याची आवक सुरु झाल्यामुळे नदीपात्रातील वहनव्यय कमी झालेला असल्याने जायकवाडी धरणात सोडणारे पाणी कमी करा, अशा आ. काळेंच्या मागणीची दखल घेवून पाणी सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी फेर नियोजन करण्याचे सुधारित आदेश दिले.

त्यामुळे नगर- नाशिक जिल्ह्याचे जवळपास पाऊन टीएमसी पाणी वाचले आहे. त्यात नाशिक धरणातील ४०३ दलघफु पाणी वाचले असल्याची माहिती आ. काळे यांनी पत्रकाद्वारे दिली.

याबाबत दिलेल्या पत्रकात आ. काळे यांनी म्हटले आहे की, (दि.२६) ऑक्टोबर २०२३ रोजी गोदावरी खोऱ्यात ५० मिली मीटर ते १०० मिली मीटर पाऊस झालेला आहे. त्यामुळे वहन व्ययाचे पाणी सोडण्याची आवश्यकता नसल्याची मागणी प्रधान सचिव जलसंपदा विभाग यांच्याकडे व कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ केली होती.

सद्य परिस्थितीची माहिती घेवून त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नगर-नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्याचे फेर नियोजन करण्याचे आदेश सबंधित विभागाला दिले आहेत

वेळीच सजग राहून नगर, नाशिकच्या धरणातील पाणी जायकवाडी सोडू नये. यासाठी पाठपुरावा करणाऱ्या आ. काळे यांच्या प्रयत्नांना हे यश मिळाले असून वाचणाऱ्या पाण्यातून नगर, नाशिकच्या धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांनी आ. काळे यांचे आभार मानले आहे.

अशी पाणी कपात करणार
सदर आदेशातून पुढीलप्रमाणे पाणी कपात करण्यात येणार आहे. यामध्ये मुळा धरण नियोजित सोडायचे पाणी २.१० टीएमसी, प्रत्यक्षात सोडणारे पाणी १.९६ टीएमसी, वाचणारे पाणी ०.१४० टीएमसी, प्रवरा धरण नियोजित सोडायचे पाणी ३.३६ टीएमसी प्रत्यक्षात सोडणारे पाणी ३.१४ टीएमसी,

वाचणारे पाणी ०.२२० टीएमसी, गंगापूर धरण नियोजित सोडायचे पाणी ०.५० टीएमसी प्रत्यक्षात सोडणारे पाणी ०.३५ टीएमसी, वाचणारे पाणी ०.१५० टीएमसी, गोदावरी दारणा धरण नियोजित सोडायचे पाणी २.६४३ टीएमसी प्रत्यक्षात सोडणारे पाणी २.३९ टीएमसी, वाचणारे पाणी ०.२५३ टीएमसी, असे एकुण ०.७६३ टीएमसी पाणी वाचणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe