Ahmednagar News : भंडारदरा धरणाच्या पाणलोटाला गारपिटीसह अवकाळी पावसाने झोडपले. या पावसाने मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांच्या घरांचे नुकसान झाले आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात दुपारी ३ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार गारांचा पाऊस पडला. यावेळी जोरदार वाराही वाहत होता. जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक आदिवासी बांधवांच्या घरांची कौले उडाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
![Ahmednagar News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/11/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-2023-11-27T171314.398.jpg)
उडदावणे गावामध्ये सर्वात जास्त घरांचे नुकसान झाले आहे. हा पाऊस साम्रद, रतनवाडी, लव्हाळवाडी, शिंगणवाडी, उडदावणे या परिसरात कोसळला. पाऊस कोसळत असतानाच प्रचंड प्रमाणात गारपिट झाली.
या गारपिटीमुळे आदिवासी बांधवांच्या उभ्या भातपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर सोंगुन ठेवलेल्या भातपिक वाहुन गेले असुन रचुन ठेवलेल्या भाताच्या पेंढ्यांचेही नुकसान झाले आहे.
हा पाऊस एक ते दिड तास सुरु होता. काही दिवसांपूर्वीच याच भागाला अवकाळी पावसाने झोडपले होते. तेव्हाही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन महसूल विभागाने नुकसानीची पाहणी केली होती.
रविवारी झालेल्या गारपिटीने नुकसान भरपाईची मागणी आदिवासी बांधवांनी केली असुन शासनाने तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी केली आहे.
पावसाने झालेल्या नुकसानीचे शासनाकडुन पंचनामे होतात; मात्र ही नुकसानभरपाई फक्त कागदावरच राहात असुन तीन वर्षांपुर्वी अशाच पावसाने उडदावण्यातील बुवाजी गांगड यांच्या घराचे नुकसान झाले होते. अद्यापही या नुकसानीची कोणतीही भरपाई शासनाकडुन मिळाल नसल्याचे यावेळी बुवाजी गांगड यांनी सांगितले.
भंडारदरा धरणाच्या पाणलोटाला काल रविवारी दुपारी पावसाने झोडपल्यानंतर संध्याकाळी साडे सहा वाजेपासून पुन्हा पाणलोटासह शेंडी, भंडारदरा, गुहीरे, चिंचोडी, मुरशेत, मुतखेल, बारी, वारंघुशी परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. रात्री उशिरा पर्यंत हा पाऊस सुरुच होता.