अहिल्यानगर- जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने ८९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये टोमॅटो, गहू, कांदा, आंबा, डाळिंब, द्राक्षे, वाटाणा, मका, झेंडू, भाजीपाला आणि बाजरी यासारख्या पिकांचा समावेश आहे. महसूल आणि कृषी विभागाने तत्काळ पंचनामे सुरू केले आहेत.

अवकाळी पावसाचा फटका
अहिल्यानगर, संगमनेर, अकोले, पारनेर आणि कर्जत तालुक्यांना या अवकाळी पावसाचा जबर फटका बसलेला आहे. ३९ गावांतील २०२२ शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले. अहिल्यानगर, संगमनेर, अकोले, पारनेर आणि कर्जत तालुक्यांत याचा मोठा प्रभाव पाहायला मिळाला.
संगमनेरमध्ये सर्वाधिक ६७७.५२ हेक्टरवरील पिके बाधित झाली तर पारनेरमध्ये २५९ शेतकऱ्यांचे १२८ हेक्टरवरील नुकसान तसेच कर्जतमध्ये ५३ शेतकऱ्यांचे १३ हेक्टरवरील नुकसान आणि
अकोलेमध्ये २२० शेतकऱ्यांचे ७२ हेक्टरवरील नुकसान झालेले आहे.
शहरासह ग्रामीण भागात पाऊस
गुरुवारी शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांत अहिल्यानगर तालुक्यातील सावेडी १.५, कापूरवाडी १.५, चिंचोडी ६८, रुईछत्तीशी ५.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी २८.३, कान्हूरपठार २८.३, कर्जत तालुक्यातील मिरजगाव ४४.५, माहिजळगाव १८, जामखेड तालुक्यातील अरणगाव ८.५, अकोले तालुक्यातील विरगाव १०८ मिमी पाऊस झाला.
कांदा शेतकरी अडचणीत
पारनेर तालुक्यात ३१,७८१ हेक्टरवर गावरान कांदा लागवड झाली आहे, त्यापैकी १० ते १२ हजार हेक्टरवरील कांद्याची काढणी पूर्ण झाली आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकरी उर्वरित कांदा तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत.
सरकारकडून मदतीची अपेक्षा
राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करावी आणि नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.