राहुरी- तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या गारपीटयुक्त वादळी पावसाने शेतकऱ्यांची मोठी हानी केली आहे. म्हैसगाव, कोळेवाडी, दरडगाव थडी व आसपासच्या गावांमध्ये जोरदार वाऱ्याबरोबर गारपीट झाल्याने कांदा, केळी, मका, चारा पिके आणि गहू यांना फटका बसला.
शेतकरी आपल्या पिकांची काढणी करून विक्रीसाठी सज्ज झाले असतानाच निसर्गाच्या या अवकाळी कोप्याने सर्व मेहनत वाया गेली आहे.

कांदा आणि केळी पिकांचे नुकसान
शेतात सुकवण्यासाठी काढून ठेवलेला कांदा भिजल्याने त्याची प्रत खराब होणार आहे. कांदा बियाणाचे गोंडे पावसाने झोडपून काढले आहेत. केळी पिकाची पानं वाऱ्याच्या झोतात झिरमाळून गेली आहेत.
हे दोन्ही व्यापारी पीक असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्याचप्रमाणे मका, घास आणि हत्ती गवत या चारा पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे, ज्याचा थेट परिणाम पशुधन व दुग्ध व्यवसायावर होणार आहे.
झाड पडून गाड्यांचे नुकसान
दरडगाव थडी व आग्रेवाडी परिसरात वाऱ्याचा वेग इतका जोरदार होता की आग्रेवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेले बाभळीचे झाड तुफान वाऱ्यात पडून एका टपरीवर कोसळले.
या टपरीखाली पाच दुचाकी दबल्याने वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने टपरीत असलेले लोक अडोशाला शिरल्याने जीवितहानी टळली. दरडगाव येथील रामदास रोकडे, तुळशीराम गुंजाळ व पाराजी दोंदे यांच्या घरांचे पत्रेही उडून गेले आहेत.
शेतकऱ्यांची पंचनाम्याची मागणी
या अवकाळी पावसामुळे सुमारे १५० ते २०० शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. स्थानिक ग्राम महसूल अधिकारी संजय डोके यांनी तत्काळ नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून प्राथमिक पंचनामा केला आहे.
बाधित शेतकऱ्यांनी शासनाकडे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. व्यापारी आणि चारा पिकांबरोबरच उशिरा पेरलेला गहू पीकही पावसाच्या तडाख्यात सापडल्याने या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे.













