अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
फळ बागायतदार शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी मानव विकास परिषदेच्या तालुका महिला अध्यक्ष सारिका बारगुजे यांनी केली.
आधीच कोरोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना मागील चार पाच दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर आस्मानी संकट आलेले असून श्रीगोंदे शहरासह तालुक्यातील घोटवी, कोळगाव बेलवंडी, पारगाव सुद्रीक, काष्टी, उक्कडगाव, येळपणे, पिंपळगाव पिसा, लोणी व्यांकनाथ, एरंडोली,
घारगाव परिसरासह तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अवेळी आलेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे महागडी औषधे, फवारण्या यामुळे कंबरडे मोडले. या पावसाने काढणीला आलेला कांदा भिजून खराब झाला असून कपाशी, लिमुनी या पिकांना मोठा फटका बसला आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, असेही सारिका बारगुजे यांनी सांगितले. राजापूर भागात सुमारे १० ते १२ शेळ्या आणि मेंढ्यांच्या मृत्यू झाला असून मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे.
अवकाळीमुळे द्राक्ष आणि कांद्याचे नुकसान झाले. तहसीलदार यांनी पंचनाम्याचे आदेश देताच कृषी सहायक यांच्यामार्फत पंचनामे करू, असे तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम