दुष्काळी पट्टयातील गावांमध्ये निळवंडेच्या कालव्यातून तातडीने पाणी सोडा : आ. बाळासाहेब थोरात !

जिल्ह्याला वरदान ठरणारे भंडारदरा व निळवंडे धरण भरले असून निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून ओहरफ्लोचे पाणी तातडीने दुष्काळग्रस्त भागाला सोडून जिरायत भागातील सर्व बंधारे भरून घ्यावेत, अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

निळवंडे धरण हे दुष्काळी भागातील १८२ गावांसाठी निर्माण केले असून या भागाला हे धरण वरदान ठरणारे आहे. मागील आठवड्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने भंडारदरा व निळवंडे धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

असे असले तरी निळवंडेच्या लाभ क्षेत्रात मात्र अत्यंत कमी पाऊस झाला असल्याने लाभक्षेत्रातील सर्व ओढे नाले कोरडेठाक आहेत. संगमनेर तालुका हा पर्जन्यछायेत असून येथे अत्यंत कमी पाऊस झाला आहे. तसेच तळेगाव सह दुष्काळी पट्टयातील अनेक गावांमध्ये पाण्याची मोठी टंचाई आहे.

आमदार थोरात यांनी पुढे म्हटले आहे की, निळवंडे धरण ओव्हरफ्लो झाल्याने ते अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला प्राधान्याने दिले गेले पाहिजे. लाभ क्षेत्रात कमी झालेला पाऊस, पाण्याची टंचाई, यामुळे या नागरिकांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, याकरीता सरकारने तातडीने निळवंडे धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडून जिरायत भागातील सर्व पाझर तलाव व बंधारे तातडीने भरून द्यावे.

संगमनेर तालुक्यासह उत्तर नगर जिल्हा हा पर्जन्यछायेत असून ऐन पावसाळ्यात सुद्धा अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याचबरोबर पिण्याच्या पाण्यासह पशुधन वाचवणे हे देखील जिकरीचे झाले आहे.

पावसाची अशाश्वती आणि पुढील काळातील नियोजन याकरीता निळवंडे कालव्याच्या मधून येणाऱ्या ओहरफ्लोच्या पाण्यातून संगमनेर, राहाता, कोपरगाव, राहुरी या तालुक्यातील निळवंडे धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी व नागरिकांना भविष्यातील समस्यांमधून काहीसा दिलासा मिळणार आहे.

प्रशासनाने कोणताही वेळ वाया न घालवता तातडीने डाव्या आणि उजव्या कालव्याला पाणी सोडून दुष्काळी भागातील सर्व बंधारे, पाझर तलाव भरून द्यावे, अशी मागणी आमदार थोरात यांनी केली आहे.