Ahmednagar News : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात तोडफोड करण्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला. जन आधार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे याने हा प्रकार केला. पोलिसांनी त्याला अटक केली. आता त्याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात काल (शुक्रवार) खंडणीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी दोन शासकीय कंत्राटदारांनी स्वतंत्र फिर्यादी दिल्या आहेत.
पहिली फिर्याद कंत्राटदार मोहसीन पिरमहंमद शेख (वय ३२ रा. मुकुंदनगर) यांनी दिली. या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात पोटे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा परिषदेत अंतर्गत करण्यात आलेल्या जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले असून त्याचे व्हिडीओ शुटींग व्हायरल करायचे नसल्यास प्रत्येक कामासाठी २५ हजार रूपये द्यावे लागतील, अशी मागणी शासकीय कंत्राटदाराकडे करण्यात आली होती. असे फिर्यादीत म्हटले आहे.
तसेच, ५ जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास शेख व लेबर ठेकेदार संजय शिवाजी लांडगे यांना जिल्हा परिषदेच्या गेटवर प्रकाश पोटे भेटला व त्याने हातवळण व कोल्हेवाडी येथील पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम हे निकृष्ट दर्जाचे आहे, त्याचे शुटींग आहे, तुम्ही मला प्रत्येक कामासाठी २५ हजार रूपये द्या, नाहीतर ते व्हायरल करीन, तुमची चौकशी लावील’, अशी धमकी देत खंडणीची मागणी केली.
दुसरी फिर्याद शासकीय कंत्राटदार विलास आप्पसाहेब जगताप (रा. सावेडी) यांनी दिली असून त्यांनी टाकळीकाझी ते भातोडी- बीड रस्त्याचे काम घेतले होते ते पोटे याने बंद पाडले होते. ते काम पुन्हा सुरू करण्यासाठी पोटे याने १८ जानेवारीला जगताप यांच्याकडे जिल्हा परिषदेत एक लाख रूपयांची मागणी केली असल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत तोडफोड प्रकरणी अटकेत असणाऱ्या पोटे यावर दोन खंडणीचे गुन्हे
दाखल झाले आहेत.