अकोले तालुक्यात वरुण राजा बरसला, भंडारदऱ्यात धुव्वाँधार तर घाटघरला मुसळधार पावसाची हजेरी !

Ahmednagarlive24 office
Published:
musaldhar paus

गेल्या २४ तासामध्ये भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला असून घाटघर येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. भंडारदरा धरणाच्या परीसरातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने सर्व परिसर जलमय झाला आहे.

अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्टयात पावसाचे तांडव सुरूच आहे. घाटघरला पावसाने रौद्ररुप धारण केले आहे. सतत कोसळत असणारा पाऊस व प्रचंड धुके यामुळे घाटघर गाव धुक्यामध्ये हरवले आहे.

उडदावणे येथील काळु नदीलाही पुर आला आहे. जून महिन्यामध्ये भंडारदऱ्याला पावसाने हुलकावणी दिली होती; मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच भंडायदऱ्यावर वरुण राजा खुश झालाअसल्याचे दिसून येत आहे.

या महिन्याच्या एक तारखेपासून सुरू झालेला पाऊस अद्यापही भंडारदरा धरणाच्या परिसरात तसेच पाणलोटात कोसळत आहे. धरणक्षेत्रात पावसाची अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा वाहत असल्याने हवेत गारवा पसरला आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांनी आपली जनावरे घरातच बांधणे पसंत केले असुन जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

मात्र आदिवासी बांधवांची भात खाचरे पाण्याने तुडुंब भरल्याने भात लागवडीला वेग आल्याचे चित्र दिसत आहे. गत २४ तासांमध्ये घाटघर येथे ६२ मीमी पावसाची नोंद झाली असुन रतनवाडी येथे ५६ मीमी पाऊस पडला आहे.

तसेच पांजरे येथे ४७ मिलीमीटर तर भंडारदरा धरणावर १४ मीमी पाऊस कोसळला असून वाकी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. वाकी धरणावरून ५५६ क्युसेकने पाणी कृष्णावंती नदीमध्ये वाहत असल्याची माहिती भंडारदरा धरण शाखेकडून उपलब्ध झाली आहे.

गत १२ तासामध्ये भंडारदरा धरणाचा पाणीसाठा अडीच टीएमसीच्या आसपास पोहोचला असुन धरणाचे पाणी २४९८ दलघफु झाले आहे. भंडारदरा धरण २२.६३% भरले आहे. १२ तासांमध्ये भंडारदरा धरणामध्ये २३० दलघफु नवीन पाण्याची आवक झाली आहे. धरणाच्या पाणी साठ्यावर भंडारदरा धरण शाखेचे शाखाधिकारी अभिजीत देशमुख यांच्या अधिपत्याखाली प्रकाश चव्हाण लक्ष ठेवून आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe