पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात रविवारी दुपारनंतर व सोमवारी रात्री पावसाने हजेरी लावल्याने सर्व परीसर जलमय झाला. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने खरीप पिकांची वाढ चांगली झाली असून, पिकांचे उत्पादनात चांगली वाढ होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
दमदार पावासामुळे पाणी नालीमध्ये बसत नसल्याने ते रस्त्यावरून वाहिल्याने रस्ते धुवून निघाले. अनेकांच्या शेतामध्ये काही काळ पाणी साचले. आठवडे बाजारातील व्यापारी व ग्राहकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. परिसरातील तलावांच्या जलसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे.
ग्रामीण भागात शेतीला प्राधान्य असून, उभ्या वर्षाचे उत्पन्न हे शेतीवरच अवलंबून आहे. यावर्षी जूनच्या सुरुवातीलाच मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील मुगाच्या पेरण्या वेळेवर उरकल्या व नंतरही पिकास पोषक पाऊस झाल्याने पिके जोमदार आली असून, खरीप पिकांना पावसामुळे जीवदान मिळाले आहे.
यंदा समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता, त्यानुसार पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने खरीपाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात झाल्या व पिकेही जोमदार असल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
रिपरीप पावसाने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागल्याने पशुपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा वेळेवर पडलेल्या पावसामुळे सोयाबीन, तूर, उडीद, मूग अशी खरीपाची सर्वच पिके तरारली आहेत.
पावसाळ्यापूर्वी जनावरांना हिरवा चारा नसल्याने कडबा व मुरघासावरच जनावरांची मदार होती. शेतीच्या बांधावर गवत नसल्याने शेळ्या, मेंढ्या, दुभती गाय, म्हशी यांची चारा पाण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी गोठ्यातच केली होती.
मात्र मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पावसाचे आगमन झाले, वेळेवर पडलेल्या पावसाने मूग पेरणी वेळवर झाली, सध्या शेतात पिके डोलत आहेत. पाऊस सध्या उघडझाप करीत असून, कधी धुव्वाधार, कधी रिपरिप तर कधी रिमझीम पडत आहे. गेल्या आठवड्यापासून वातावरण ढगाळ असून, सूर्यदर्शन होत नाही. परिसरातील सर्वच गावांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.