वीर जवान सुभाष लगड अनंतात विलीन..! कोळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Ahmednagar News

Ahmednagar News : भारत माता की जय. वंदे मातरम्‌… सुभाष लगड अमर रहे… वीर जवान अमर रहे…च्या घोषणा देत श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील शहीद जवान सुभेदार सुभाष श्रीरंग लगड यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुभेदार सुभाष श्रीरंग लगड हे १९९७ साली भारतीय सेनेत भारती झाले होते. त्यांनी पुढे शिक्षण घेत पदोन्नती मिळवून ते सुभेदार पदापर्यंत पोहचले होते. सध्या त्यांची ११६ इन्फंट्री पैरा बटालियनमध्ये दिल्ली येथे पोस्टिंग होती. मुलांच्या शाळेच्या अँडमिशनसाठी मार्च महिन्यात सुट्टीवर आलेल्या सुभेदार मेजर सुभाष श्रीरंग लगड यांना शनिवारी दि.३० रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास हृदय विकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्यांचे बुधवारी संध्याकाळी उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. गुरुवारी (दि.४) रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सुभेदार सुभाष लगड यांचे पार्थिव लष्काराच्या गाडीमधून कोळगाव येथे आणण्यात आले. या वेळी नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरम्‌, सुभाष लगड अमर रहे, वीर जवान अमर रहेच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

कोळगाव बस स्थानकापासून अंत्ययात्रेला सुरवात झाली. फुलांनी सजवलेल्या टेम्पोमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. श्रीगोंदा तालुक्‍यातील नागरिकांनी अंत्ययात्रेसाठी गर्दी केली होती. या नंतर कण्हेरमळा येथील घरी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. लष्काराच्या जवानांनी हवेत फैरी झाडून मानवंदना दिल्यानंतर शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

२७ वर्षे देशसेवेसाठी अपर्ण करणारा अवलिया सुभेदार सुभाष लगड हे भारतीय सैन्यदलामध्ये भरती झाले. होते. देशसेवेचा वारसा त्यांचे मोठे भाऊ बाळासाहेब लगड यांच्याकडून मिळाला होता. बाळासाहेब लगड हे १८ मराठा इन्फंट्रीमधून हवालदार या पदावरून निवृत्त झाले असून, ते नागवडे कारखान्याचे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत तर चुलत बंधू कल्याण लगड १४ मराठा इन्फंट्रीमध्ये हवालदार या पदावरून निवृत्त होत पुणे पोलिस दलात कार्यरत आहेत.

अंत्ययात्रेला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ, पोलिस निरीक्षक संतोष भंडारे, एन डी रेजिमेंट अहमदनगरचे नायक सुभेदार अर्जुन सिंग, ११६ इन्फंट्री बटालियन टी. ए. पेराचे नायब सुभेदार श्रीकृष्ण निसाळ, नायब सुभेदार गांगवे संभाजी तुकाराम तसेच १७ ऑदर रॅन्क,

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, ज्ञानेश्‍वर विखे, आ. निलेश लंके यांचे बंधू दिपक लंके, माजी आमदार राहुल जगताप यांचे बंधू कल्याण जगताप, निवृत्त कर्नल बबनराव थोरात यांच्यासह हजारो नागरिकांसह जिल्ह्यातील माजी सैनिकांनी उपस्थित राहत श्रद्धांजली अर्पण केली.

कुटुंबाचा टाहो हृदयाचे ठोका चुकविणारा

सुभेदार सुभाष लगड काही दिवसांपूर्वीच सुट्टीवर आले होते. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबाचे छत्र हरपले आहे. या वेळी सुभाष यांची पत्नी सुरेखा, दोन्ही मुले,

आई -वडील यांनी टाहो फोडीत डोळ्यांतून निघालेल्या अश्रूंनी हृदयाचा ठोका चुकविणारे वातावरण होते. त्यांच्यामागे आई, वडील, भाऊ बाळासाहेब, पत्नी सुरेखा, दोन मुले सिद्धार्थ, अर्णव व पुतणे, असा परिवार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe