शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) विजय विष्णुप्रसाद मर्दा सध्या अटकेत आहे. आता त्यांना व साहित्य खरेदीतील डीलर जगदीश बजाराम कदम यांना डॉ. उज्वला कवडे यांच्या फिर्यादीवरून दाखल असलेल्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने वर्ग करून घेतले आहे. आता याप्रकरणी न्यायालयाने गुरूवारी (दि. 21) दोघांना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आता हे दुसरे काय आहे प्रकरण?
डॉ. निलेश शेळके याच्यासह काही डॉक्टरांनी एकत्र येऊन नगर शहरात ‘एम्स’ नावाने रूग्णालय सुरू केले होते. या रुग्णालयाच्या यंत्रसामुग्रीसाठी शहर बँकेकडे कर्ज प्रकरण देखील केले गेले होते. मात्र यामध्ये फसवणूक झाल्याप्रकरणी डॉ. रोहिणी सिनारे, डॉ. उज्वला कवडे आणि डॉ. विनोद श्रीखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. यातील डॉ. रोहिणी सिनारे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात विजय मर्दा व जगदीश कदम या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती.
पोलीस कोठडीत या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयीत आरोपींना शहर बँकेच्या डॉ.कवडे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात वर्ग करून घेत अटक केली. न्यायालयाने दोघांना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.