अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- शेतकर्यांकडून सक्तीने पाणीपट्टी वसूल करण्याचा जलसंपदा विभागाचा निर्णय हा शेतकर्यांवर अतिशय अन्यायकायक असल्याने शेतकर्यांकडुन केली
जाणारी पाणीपट्टी माफ करुन शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

आ. विखे पाटील यांनी म्हटले आहे की, मागील तीन वर्षांपासून कोविड संकटाने सर्वच समाज घटकांसमोर आव्हान उभे राहिले आहे. यामध्ये प्रामुख्याने शेती आणि शेतकर्यांच्या समस्या अधिकच बिकट झाल्या आहेत.
या वस्तुस्थितीकडे आ. विखे पाटील यांनी लक्ष वेधले. कोविड संकटाचे वातावरण अद्यापही कायम असतानाच अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीचाही सामना शेतकर्यांना करावा लागला आहे.
यामध्ये शेतातील उभी पीक जमीनदोस्त झाल्याने कोणतेही उत्पन्न शेतकर्यांच्या हाती पडलेले नाही. शासनाने मदत जाहीर केली, परंतु शेतकर्यांपर्यंत ती पोहचू शकली नाही.
त्यातच घेतलेल्या शेती कर्जाची आणि थकीत वीज बिलाची वसुलीही सरकारने न थांबवल्याने शेतकर्यांवर सर्वच बाजूंनी आर्थिक संकट ओढवले असल्याची बाब आ. विखे यांनी जलसंपदा विभागाच्या निदर्शनास आणून दिली.
कोविड संकटानंतर ग्रामीण भागात निर्माण झालेल्या समस्या विचारात घेवून जलसंपदा विभागाने लाभधारक शेतकर्यांची पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी विखे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम