विखे-पाटील यांच्या अडचणीत वाढ : उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल … काय आहे नेमके प्रकरण

Published on -

२९ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता टेंभुर्णी येथे त्यांनी वाळूविरोधातील कारवाईबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असे जाहीर वक्तव्य करून अवैध वाळू उपशाला चालना देण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करीत शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळे विखे-पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात वाळू तस्करांचा सुळसुळाट सुरू आहे. अधिकाऱ्यांना दमदाटीचे प्रकार वाढले आहेत. याबाबतीत तक्रारीचे प्रमाण वाढले असताना वाळू चोरांबाबत कारवाई होणे तसेच मंत्री म्हणून अशा कारवायांसाठी प्रशासनाला पाठबळ देणे अपेक्षित असताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अधिकाऱ्यांनाच समज दिली असल्याचे वक्तव्य जाहीर भाषणात केले होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

‘त्या’ वक्तव्याकडे लक्ष वेधत विरोधकांनी विखे-पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. विखे-पाटील यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही शिवसेना नेते कोळी यांनी केली होती. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात विखे-पाटील यांच्याविरोधात याचिका दाखल केली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच एसआयडीकडून चौकशी करावी, अशी मागणी कोळी यांनी केली आहे. त्यामुळे आता विखे पाटील यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe