अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagar News :- गावांची नावे बदलणे किंवा नामविस्तार करण्याची मागणी संबंधित गावातून केली जाते. नगर जिल्ह्यात मात्र एका नेत्याच्या गावाच्या नामविस्ताराची मागणी गावकऱ्यांनी नव्हे तर नगर शहरातील एका संघटनेने केली आहे.
या गावाला पदमश्री लोणी असे नाव द्यावे, असा प्रस्ताव पीपल्स हेल्पलाईन या संघटनेच्या वतीने ठेवण्यात आला आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या सहकाराच्या स्थापनेतील योगदानाची जाणीव ठेवून हा बदल करण्याचे संघटनेने सूचविले आहे.
सरकारने यावर निर्णय घेतला नाही, तर आम्ही एक मेपासून हा नामविस्तार करू, असा इशाराही संघटनेतर्फे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांनी दिला आहे.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व डॉ. धनंजय गाडगीळ यांनी देशात सहकाराची पायाभरणी केली. सहकाराने ग्रामीण भागाची मोठी प्रगती झाली.
त्यामुळेच भारत सरकारने राष्ट्रपतींच्या हस्ते विठ्ठलराव विखे यांना पद्मश्री हा बहुमान दिला. सहकाराची मुहुर्तमेढ रोवणार्यांच्या कार्याला सलाम म्हणून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात लोणीचे पद्मश्री लोणी असे नामविस्तार करण्याचा प्रस्ताव या संघटनेने दिला आहे.
हा प्रस्ताव शासनाने मंजूर करावा, अन्यथा जनतेच्या प्रजासत्ताकचा अधिकार वापरुन पद्मश्री लोणी असे जाहीर केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावर भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील किंवा लोणी ग्रामस्थांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.