Ahmednagar News : नगर तालुक्यातील देहरे येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या विविध मागण्यांसाठी गावात उपसरपंच दिपक जाधव यांनी ग्रामस्थांसह उपोषण सुरु केले आहे. शनिवारी (दि.३०) उपोषणाचा तिसरा दिवस उलटून देखील उपोषणाची दखल घेतली गेली नसल्याने ग्रामस्थांनी उपोषण सुरु ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे.
दरम्यान तहसीलदार संजय शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र ठोस आश्वासन मिळत नसल्याने उपोषण सुरु ठेवले आहे. ग्रामस्थांनी उपोषणाची तातडीने दखल न घेतल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता नगर-मनमाड महामार्गावर बसण्याचा इशारा दिला आहे.
देहरे येथील रेल्वे ओलांडणी पुलाकरता जोड रस्त्यासाठी सन १९९५ मध्ये भूसंपादन करण्यात आले होते. परंतु आज २५ वर्षे उलटून देखील संबंधित शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही.
दरम्यानच्या काळात व आजही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कार्यालयांना खेटा घालावा लागत आहेत. यामध्ये गरीब शेतकऱ्यांचा छळ होत आहे. राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय मार्गावर उड्डाणपूल झाल्यानंतर ग्रामस्थांच्या सोयीसाठी सर्विस रोड करुन देणे बंधनकारक असताना देहरे गावासाठी असा कोणत्याही प्रकारचा सर्विस रोड करून देण्यात आलेला नाही.
गावात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध धंद्यामुळे स्थानिक तरुण वाम मार्गाला लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाला वेळोवेळी तक्रार करुन देखील गावातील अवैध धंद्यांवर कारवाई न करता दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
देहरे येथीलउड्डाणपूल झाल्यानंतर रेल्वे गेट बंद करण्यात आले. त्यानंतर एका कंपनीने नगर कोपरगाव रस्त्याचे काम घेतले. त्यावेळी देहरे भुयारी मार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. रेल्वे खालुन भुयारी मार्ग पूर्ण करण्याचे अवघड काम रेल्वेने सन २००० सालीच पूर्ण केले. परंतु भुयारी मार्गाचे संबंधित कंपनीने आश्वासन देऊनही काम पूर्ण केलेले नाही.
आजच्या स्थितीला रेल्वेचे दुहेरी मार्गाचे काम आहे. त्यामुळे गावाचे दोन भाग झाले आहेत. गावाच्या पचिम भागात आरोग्य केंद्र, हायस्कुल, महाविद्यालय, बैंक, प्राथमिक शाळा, गावठाण ही महत्त्वाची केंद्र आहेत. तर पूर्व भागात दुध डेअरी,
मेडिकल, बस स्टॅण्ड अशी केंद्र असल्याने ग्रामस्थ, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी व महिला वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या उपोषणात व्हि. डी. काळे, ‘भानुदास भगत, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष रमेश काळे, संजय शिंदे, उत्तम काळे, मेघनाथ धनवटे, दत्तात्रय लांडगे, दत्तात्रय काळे, संदीप काळे, भाऊसाहेब ढोकणे, अर्जुन काळे, अमोल बानकर,
प्रदीप कोळपकर, माजी सरपंच अब्दुल खान, सुभाष खजिनदार, डॉ. अनिल लांडगे, तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल पटारे, आप्पासाहेब शिंदे, अमोल जाधव, भानुदास भगत सहभागी होऊन पाठिंबा दिला.