अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कोंभळी, खांडवी आणि रवळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी नियोजित एमआयडीसीला तीव्र विरोध दर्शवला आहे. सरकारने चुकीच्या पद्धतीने उताऱ्यांवर नोंद लावून शेतजमिनी अधिग्रहण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याविरोधात शेतजमीन बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन छेडण्यात आले.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीसाठी कोंभळी-थेरगाव आणि रवळगाव परिसरातील जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. मात्र, ग्रामस्थांना विश्वासात न घेता हा प्रकल्प रेटला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. महिलांसह शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

शेतकऱ्यांच्या जमिनींच्या उताऱ्यांवर ‘विक्रीस मनाई’ अशी नोंद केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे शेतजमिनी विक्रीही करता येत नाहीत, आणि आता शासन त्यावर अधिकार गाजवू पाहत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी ‘एमआयडीसी रद्द करा’, ‘आमच्या काळ्या आईचा सौदा रद्द करा’, ‘सुपीक जमिनीतून एमआयडीसी हद्दपार करा’ अशा जोरदार घोषणा दिल्या. आंदोलनकर्त्यांनी सरकारला थेट इशारा देत “आमची जमीन घेतली, तर आम्हाला मरणाशिवाय पर्याय नाही. एमआयडीसी रद्द झाली नाही, तर आत्मदहन करू” असे स्पष्ट केले.
ग्रामस्थांच्या मते, हा प्रकल्प केवळ राजकीय श्रेयासाठी रेटला जात आहे. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता शेतकरी भूमिहीन करण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शेतकरी आणि स्थानिक नागरिकांशी कोणतीही चर्चा न करता हा प्रकल्प आखण्यात आला आहे. अधिग्रहणासाठी यथोचित नोटीस किंवा शेतकऱ्यांच्या संमतीची प्रक्रिया राबवण्यात आली नाही. यामुळे सरकारच्या हेतूबाबत शंका निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांच्या मते, बागायती आणि सुपीक जमिनीत एमआयडीसी उभारली जाणार असल्याने भविष्यात शेतकरी देशोधडीला लागतील. एवढी मोठी योजना आखताना पाणीपुरवठा, पर्यावरण आणि शेतीच्या भविष्यासंदर्भात कोणतेही विचारमंथन झाले नाही, असा आरोपही ग्रामस्थांनी केला.
ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत “मागील ४० वर्षांपासून आम्ही पाण्यासाठी लढतोय, पण सरकारने पाण्याची सोय केली नाही. मात्र, उद्योगांसाठी आमच्या जमिनी ताब्यात घेण्यास ते तत्पर आहेत” अशी तीव्र प्रतिक्रिया दिली.
ग्रामस्थांच्या आंदोलनाला वैभव तापकीर, भरत वायसे, वैशाली तापकीर, योगिता गांगर्डे, विकास गांगर्डे, अक्षय गांगर्डे, गणेश खंडागळे, मीनिनाथ तापकीर, पप्पू तापकीर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.
ग्रामस्थांनी सरकारला थेट आव्हान देत “आमच्या जमिनी घेतल्या जात असतील, तर आधी आम्हाला विष द्या” अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला. शेतजमीन बचाव कृती समितीने लवकरच मोठे आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. कर्जत तालुक्यातील या प्रश्नावर प्रशासनाने अद्याप मौन बाळगले आहे, मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकारसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.