“एकदा झालेली चूक मतदार पुन्हा करीत नाहीत; माजीमंत्री राम शिंदेंनी लगावला टोला

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar Politics :-“एकदा झालेली चूक मतदार पुन्हा करीत नाहीत. ती चूक चांगल्या प्रकारे त्यांच्या लक्षात आलेली आहे. पुढील वेळी सावधगिरी बाळगली जाते. त्यामुळे ती चूक पुन्हा होत नाही.

तशा प्रकारे ‘राष्ट्रवादी’च्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघाचाही असाच ‘ड्रॉप’ झालेला आहे, अशी भावना माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केल्या. अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जवळ आली आहे.

त्या दृष्टीने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राम शिंदे यांनी सिद्धटेक येथे भाजपची बैठक घेतली. कुळधरण जिल्हा परिषद गटातील गणप्रमुख,

गटप्रमुख तसेच शक्तीकेंद्रप्रमुख यांना मार्गदर्शन करताना त्यांनी नाव न घेता रोहित पवार यांच्यावर टीका केली. कर्जत व जामखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांच्यात सत्ता संघर्ष सुरू आहे.

जामखेडमधील भाजपचे काही महत्त्वाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राम शिंदे यांनी गेलेल्यांची परवा न करता पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर द्यायला सुरवात केली आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील समस्यांची कोणत्याही प्रकारची जाण नसताना इतर ठिकाणाहून येऊन केवळ दडपशाहीने विजय मिळवणारांना आगामी काळात जनमतातूनच चांगली चपराक बसणार असल्याचे राम शिंदे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe