शिर्डी- शिर्डीमध्ये साईभक्तांना त्रास देणाऱ्या भिक्षेकऱ्यांवर कारवाई करताना पोलिसांनी पुन्हा एकदा मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल ५० भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.
शिर्डी पोलिस, नगर परिषद आणि साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम यशस्वी झाली. या भिक्षेकऱ्यांपैकी अनेक जण चार वेगवेगळ्या राज्यांतील आणि बारा जिल्ह्यांतील होते.

यापूर्वीही २० फेब्रुवारीला अशाच प्रकारची कारवाई करून ७२ भिक्षेकऱ्यांना बेगर होममध्ये पाठवण्यात आले होते.
इस्रोतील अधिकारी असल्याचा दाव्याने खळबळ
या कारवाईमध्ये विशेष लक्ष वेधून घेतलेल्या एका व्यक्तीने आपण इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) मध्ये काम केले असल्याचा दावा केला.
त्याने आपले नाव नारायणन असल्याचे सांगितले आणि २००८ साली मुदतपूर्व निवृत्ती घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार, पत्नीचे निधन झाल्यानंतर तो एकटाच देशभरातील तीर्थक्षेत्रांना भेट देत आहे.
१२ लाखांची फसवणूक
या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, भावाने आपली १२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. मुलगा सध्या दुबईमध्ये नोकरीला आहे आणि शिर्डीत येण्यापूर्वी नाशिकमध्ये त्याची बॅग चोरीला गेली. त्या बॅगेत २० हजार रुपये आणि ओळखपत्रे होती. त्यामुळे तो कोणतीही ओळख पटवू शकणारी कागदपत्रे सादर करू शकला नाही.
इस्रोबाबतची माहिती संशयास्पद
नारायणन याने इस्रोमधील काही विशिष्ट माहिती पोलिसांना दिली. ही माहिती सामान्य व्यक्तीला सहज उपलब्ध नसल्यामुळे पोलिसांनी त्याच्या दाव्यावर विचार करण्यास सुरुवात केली. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याने दिलेली माहिती पाहता तो इस्रोमध्ये कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुराव्याअभावी दिले सोडून
मात्र, कोणतीही लिखित वा अधिकृत कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने पोलिसांनी त्याला भिक्षेकरी गृहात न पाठवता समज देऊन सोडून दिले. पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी सांगितले की, तो भविष्यात असे कृत्य करणार नाही, अशी समज देण्यात आली आहे.
भिक्षेकऱ्याबाबत संभ्रम कायम
हा भिक्षेकरी खरोखरच इस्रोतील अधिकारी होता की हे एक बनाव होते, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. जर त्याचा दावा खरा असेल, तर त्याचे आयुष्य एका वेगळ्याच मार्गावर गेले आहे.
आणि जर बनाव असेल, तर अशा प्रकारच्या गंभीर दाव्यांमुळे भिक्षेकऱ्यांच्या खऱ्या गरजांबाबत समाजात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे यापुढील काळात अशा दाव्यांची अधिक सखोल चौकशी गरजेची ठरते.