Ahmednagar News : निळवंडे कालव्यातून १० ऑक्टोबरला पाणी !

Published on -

Ahmednagar News : निळवंडे डाव्या कालव्याच्या गळतीचे काम प्रगतीपथावर असून पाच-सहा दिवसात हे काम पूर्ण होईल. डाव्या कालव्यातून (दि. १०) ऑक्टोबर रोजी पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी दिले.

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडून जिरायती भागातील कालवे भरून द्यावे, या मागणीसाठी निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी (दि. १३) सप्टेंबर रोजी जलसंपदा विभागावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी जलसंपदा कार्यालयाकडून ३० सप्टेंबरला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर कालव्याची गळती काढण्याचे काम देखील जोरात सुरू झाले होते. मुदत संपूनही डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात न आल्याने कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काल बुधवारी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत चर्चा केली.

२१ सप्टेंबरला पावसाचे आगमन झाल्याने काळी माती टाकण्याचे काम थांबले होते. सध्या पावसाने उघडीप दिल्याने पुन्हा काळी माती टाकून गळती रोखण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे १० तारखे पर्यंत काम पूर्ण होऊन कालव्यात पाणी सोडणे शक्य असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रदिप हापसे यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, सुखलाल गांगवे, उत्तम घोरपडे, अण्णासाहेब वाघे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पाऊस पडण्या अगोदर कळस, मेंहदुरी, तिटमे वस्ती या ठिकाणी काळी माती टाकण्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले होते. मात्र संघारे वस्तीसाठी माती उपलब्ध लवकर झाली नाही. त्यामळे याठिकाणी वेळ लागला. हे काम देखील ३० सप्टेंबरपूर्वी करणे हे नियोजनात होते. मात्र २१ सप्टेंबरला पाऊस सुरू झाल्याने काळी माती काढणे शक्य झाले नाही.

■आता पावसाने उघडीप दिल्याने येत्या पाच सहा दिवसात सर्व काम पूर्ण होईल, असे कार्यकारी अभियंता हापसे यांनी यावेळी सांगितले. परतीच्या मान्सुनने राज्यात दमदार हजेरी लावली असली, तरी निळवंडे लाभक्षेत्रात अजून समाधानकारक पाऊस झाला नाही.

जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. निळवंडेच्या पाण्यातून जिरायती भागातील बंधारे भरले गेले, तर हा प्रश्न निकाली निघेल, अशी भावना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

■पाण्याची गळती पुन्हा होऊ नये, यासाठी दिड किलोमिटर प्लास्टिक कागदाचा वापर निळवंडे कालव्याच्या चाचणीवेळी पाणी गळती होऊन कळस, मेंहदूरी व निंब्रळ भागातील भागातील शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. अशी गळती पुन्हा होऊ नये,

यासाठी अशा भागात कालवा एक मिटर पुन्हा खोल खोदून त्यात माती भरून ही गळती थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या ठिकाणी काळी माती भरली आहे, अशा ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून दिड किलो मिटर लांबीच्या प्लास्टिक कागदाची व्यवस्था करण्यात आली आहे. हा कागद जास्त गळतीच्या तिटमे वस्ती, संघारे वस्ती, मेंहदुरी व कळस या चार ठिकाणी वापरण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News