Ahilyanagar News: अकोले- तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांमध्ये मोठा गोंधळ असल्याचा आरोप तालुक्यातील गावोगावच्या सरपंचांनी केला आहे. या योजनांचे काम अपूर्ण राहिल्याने आणि नियोजनाच्या अभावामुळे तालुका तीव्र पाणीटंचाईच्या संकटात सापडला आहे. सोमवारी अकोले पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत सरपंचांनी आपली खदखद मांडली. आमदार डॉ. किरण लहामटे यांनी यावेळी अपूर्ण योजनांवर ताशेरे ओढत, रखडलेल्या कामांची चौकशी आणि तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
आमदारांनी दिले चौकशीचे आदेश
बैठकीत तालुक्यातील पाणीटंचाईचे गांभीर्य अधोरेखित झाले. कोंभाळणे गावातील पाझर तलाव दुरुस्तीसाठी शासनाने मोठा निधी खर्च केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तलावातील पाण्याचा साठा अजिबात वाढला नसून, गावठाण आणि तीन वाड्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे शासनाचा पैसा वाया गेल्याची टीका करत, आमदार लहामटे यांनी या दुरुस्ती कामाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर, तालुक्यातील सर्व जलस्रोतांची पाणी तपासणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले. बैठकीला तहसीलदार सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी अमर माने, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता मोहन बिन्नर, जलजीवनचे अभियंता सुनील साळुंखे, तसेच सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.

टँकर सुरू करण्याचे निर्देश
शेरणखेल गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत निळवंडे योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर झाली, पण वीजजोडणीसाठी डीपी न मिळाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून ही योजना रखडली आहे. यामुळे गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, टँकरची मागणी करता येत नाही, कारण गाव टंचाई आराखड्यात समाविष्ट नाही. यावर आमदारांनी तातडीने डीपी उपलब्ध करून देण्याचे किंवा टँकर सुरू करण्याचे निर्देश दिले. दुसरीकडे, मन्याळे गावाजवळील कळंब गावात हातपंपाच्या पाण्यावर अवलंबून असलेले ग्रामस्थ पाणीटंचाईशी झुंजत आहेत. हातपंपाचे पाणी संपत असल्याने टँकरची मागणी करण्यात आली आहे.
पंधरा दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन
अंबेवंगण येथे खाजगी विहीर अधिग्रहित करण्याचा विचार होता, पण विहिरीचे पाणी खराब असल्याने टोपेवाडीसह चार वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. केळी ओतूर येथील पाणीपुरवठा योजना पुढील पंधरा दिवसांत सुरू होण्याची शक्यता असून, त्यानंतर गाव टँकरमुक्त होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आबितखिंड गावात सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे, आणि येथील योजनेचे काम पंधरा दिवसांत पूर्ण करून पाणीपुरवठा नियमित करण्याचे आश्वासन देण्यात आले. जायनावाडी आणि एकदरे येथील चार गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, असे जलजीवन आणि जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले.
ठोस उपाययोजना करणे गरजेच्या
मन्याळे गावासाठी पिंपळगाव खांड धरण प्रकल्पातून पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे, पण जॅकवेल आणि पोहच भिंतीचे काम बाकी असल्याने गावाला टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी नोव्हेंबर उजाडेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या तालुक्यातील तीन गावे आणि पंचवीस वाड्यांना सहा टँकरद्वारे अठरा खेपांमधून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, जलजीवन योजनांच्या गोंधळामुळे आणि अपूर्ण कामांमुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. यावर तातडीने उपाययोजना आणि पारदर्शक चौकशीची मागणी सरपंचांनी लावून धरली आहे.