Ahilyanagar News: देवगाव- निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून सध्या उन्हाळी आवर्तन सुरू आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक गावांतून हा कालवा जातो. शेतीसाठी पाणी मिळावं म्हणून शेतकऱ्यांनी कालव्यात पाइप टाकले होते. पण जलसंपदा विभागाकडून हे पाइप फोडले जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संगमनेर तालुक्यातून कालवा डोळ्यांदेखत पुढे जात असताना, स्थानिक शेतकऱ्यांना मात्र पाण्यापासून वंचित ठेवलं जात आहे, असं निळवंडे कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
पाईप फोडल्याने शेतकरी आक्रमक
गुरुवारी (दि.१) रात्री शिरापूर आणि निमगाव टेंभी परिसरात शेतकऱ्यांनी टाकलेले पाइप फोडण्यात आले. यामुळे शेतकरी चांगलेच संतापले. मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र जमले आणि पाइप फोडणाऱ्यांना अडवून धरलं. यावेळी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात घटनास्थळी पोहोचले. पोलिसही तिथे दाखल झाले. थोरात यांनी फोनवरून संबंधित अधिकाऱ्यांना, “पाइप फोडण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे?” असा सवाल केला.

पाईप जोडून देण्याच्या शेतकऱ्यांच्या सूचना
ते पुढे म्हणाले, “तुम्ही आम्हाला पाण्याचं रोटेशन नीट दिलं नाही. मागच्या तिन्ही वेळेला रोटेशनचं नियोजन बरोबर झालेलं नाही. पाणी सोडण्याचं नियोजन कुठे आहे? सहीचा कागद आम्हाला पाठवा. आमच्या कारखान्याचे लोक चार वेळा तुमच्याकडे आले, तरी तुम्ही सहीचा कागद देऊ शकत नाही, असं सांगितलं. तुमच्या लोकांनी जे पाइप फोडले, ते जोडून पाणी द्यायला सांगा.”
शेतकऱ्यांवर अन्याय
संगमनेर तालुक्याच्या बाहेरील १६ किलोमीटर कालव्यासाठी २० दिवस पाणी आणि अकोले-संगमनेर तालुक्यातील ७५ किलोमीटर कालव्यासाठी फक्त १७ दिवस पाणी, हा कसला न्याय? असा संतप्त सवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय राहणे यांनी उपस्थित केला.
ठोस उपाययोजना करणे गरजेचे
शिरापूरचे ग्रामपंचायत सदस्य अमोल पांडे म्हणाले, “आम्हाला आधी पाणी द्या, मग खाली सोडा. आमच्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यासाठी गेल्या आहेत. पाणी सोडताना जलसंपदा विभागाने नीट नियोजन करणं गरजेचं आहे. आमच्यावर अन्याय करून पाणी खाली सोडू नका आणि आमचे पाइप फोडू नका.”