Ahmednagar News : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात कमी पाऊस झाला असल्याने टंचाईची दाहकता वाढत आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. पाणीपातळी खोल गेल्याने विहिरीसह कूपनलिका कोरड्या होऊन पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ३८ गावे आणि २१० वाड्यांना ३८ टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्याद्वारे ७६ हजार ६३३ लोकांची तहान भागविली जात आहे.

दरम्यान टँकरने पाणीपुरवठा होत असला तरीही काही ठिकाणी लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मार्च महिन्यातच ही स्थिती असल्याने अजून एप्रिल आणि मे महिना आणखी तापदायक ठरणार आहे.
जिल्ह्यात उन्हाळ्यात टंचाई स्थिती निर्माण होते. त्यामुळे अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. पण, गेल्या वर्षी जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे यावर्षी टंचाईची स्थिती वाढली आहे.
जिल्हा प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यातच यावर कार्यवाही करत टंचाई आराखडा तयार करून संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेत टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
सध्या उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने टँकरला मागणी वाढली आहे. गावागावांतून प्रस्ताव दाखल होत आहेत.
कोठे किती टँकर?
पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक १९ गावे आणि वाड्यांसाठी १९ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर कर्जत, जामखेड तालुक्यातही टंचाई वाढत असून सध्या प्रत्येकी ४ गावांना झळ पोहोचली असून टँकर सुरू करण्यात आले आहेत.
नगर तालुक्यातील ३, संगमनेर तालुक्यातील ६, पारनेर तालुक्यातील २, कर्जत जामखेड तालुक्यातील प्रत्येकी चार गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. असे जिल्ह्यात ३८ गावांत ३८ टँकर सुरू असून ७६ हजार ६३३ नागरिकांची तहान भागविली जात आहे.
खासगी विहिरी आणि बोअरवेलचे अधिग्रहण होण्याची शक्यता
टंचाईची दहाकता वाढली तर प्रशासनाकडून खासगी विहिरी आणि बोअरवेलचेही अधिग्रहण करण्यात येण्याची शक्यता आहे. यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सुरूवातीला ७४ मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली होती.
त्यानंतर आणखी १३ मंडळांचा समावेश करण्यात आल्याने सध्या जिल्ह्यात ९० मंडळांमध्ये दृष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या मंडळांना दुष्काळातील सर्व सवलती मिळणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.