अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- हुकूमशाही काय आहे, हे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमुळे आज पाहायला मिळत आहे.
त्यांच्या विरोधात बोलले म्हणून खासदार राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्याचेही सोशल मीडिया अकाउंट बंद केले जात आहे. तसेच आम्ही सत्तेत आहोत म्हणून काहीही करू शकतो, अशा भूमिकेत भाजपचे नेते शेतकऱ्यांना चिरडत आहेत.

अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे. अकोले तालुका महिला काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित महिला मेळव्यात त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, की महिला घर सांभाळण्यासारखे अवघड काम करतात.
तेव्हा राजकारणातील जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडत आहेत. आज भारतमातेला केवळ एक माताच वाचवू शकते. काँग्रेसने नेहमी महिलांना नेतृत्व, सन्मान दिला आहे. याउलट, भाजप सरकार महिलांचे शोषण करत आहे.
देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. आपण गप्प बसलो, तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही असे शिंदे म्हणाल्या. या महिला मेळाव्याप्रसंगी अध्यक्षस्थानी संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे होत्या.
व्यासपीठावर काँग्रेसच्या प्रदेश महासचिव उत्कर्षा रूपवते, लता डांगे, ज्येष्ठ नेते मधुकर नवले, नगराध्यक्षा संगीता शेटे, दिलशाद शेख, मंदा नवले, स्वाती नवले, अरुणा पांडे, वनिता शेटे, सुमन जाधव उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













