Ahmednagar News : खा. सुजय विखे व आ. संग्राम जगताप यांची जोडगोळी सध्या राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चेत आहे.
दोघेही एकमेकांना एकमेकांच्या पक्षात येण्याचे आमंत्रणही देतात. आता खा. सुजय विखे यांनी पुन्हा एकदा शहर विकासाचा नारा देत विरोधकांवर तोफ डागली. मी जेव्हापासून खासदार झालो तेव्हापासून दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करत आलोय.
आता आ. संग्राम जगताप व माझ्या माध्यमातून नगर शहराला भरघोस निधी आला असून भरपूर विकासकामे सुरू आहेत आणि सुरू होणार आहेत. मात्र काही लोकांच्या मेंदूची तपासणी करण्याची गरज असून त्यांची मेंदूची तपासणी मी नक्कीच करेल असा टोला खा. विखेंनी विरोधकांना लगावला.
प्रोफेसर कॉलनी चौक येथील सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल येथे एम.आर.आय. सेंटरचा प्रारंभ खा सुजय विखे यांनी केला. यावेळी ते बोलत होते. अहमदनगर महापालिका आणि पुणे येथील लोकमान्य हॉस्पिटल मेडिकल स्टोअर्स यांच्या माध्यमातून हे सेंटर उभे राहिले आहे. यावेळी अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, महापौर रोहिणी शेंडगे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
महापालिकेचा कारभार सुधारतोय
महापालिकेच्या कारभारावर अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत होते पण आता महापालिकेचा कारभार सुधारत आहे. सर्वसामान्यांसाठी एमआरआय सेंटरची उभारणी महापालिकेच्या माध्यमातून झाली. पुढील सहा महिन्यात गोरगरिबांसाठी ५०० ते ६०० रुपयात सीटी स्कॅनची सुरुवात येथे होईल असे ते म्हणाले. तसेच सर्वात स्वस्त असे एमआरआय सेंटर महापालिकेच्या माध्यमातून सुरू झाल्याने नगरसेवकांनी शिफारस चिठ्ठ्या पाठवू नयेत असा विनंतीवजा टोलाही त्यांनी हाणला.
लवकरच कॅथ लॅब
खा. सुजय विखे यांनी यावेळी सांगितले की, महापालिकेच्या बंद अवस्थेमध्ये ज्या इमारती असतील त्यांचा वापर आता गोरगरिबांसाठी होईल. रुग्णांसाठी देखील वापर करता येईल. वर्षभरात शहराच्या विकासासाठी १० कोटी खर्च करून कॅथ लॅबची उभारणी होईल व त्याला मंजुरीही मिळाली असल्याचे ते म्हणाले. जानेवारीत काम सुरू होईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.