पती पत्नी ही संसाराची दोन चाके. आयुष्यभर एकमेकांची साथ निभावत एकमेकांचे रुसवेफुगवे झेलत आयुष्यभर संकटांचा सामना करणारी दोन जीव. परंतु बऱ्याचदा हे प्रेम इतकं घट्ट होत की पतीच्या निधनानंतर पत्नी किंवा पत्नीच्या निधनानंतर पती लगेचच आपलेही प्राण सोडतात. अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. आता अहमदनगरमधून अशीच काळजाला भिडणारी घटना समोर आली.
निळवंडे येथील निवृत्त शिक्षक वामन रामभाऊ आभाळे (वय ८६) यांचे गुरुवारी (४ जानेवारी) निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (५ जानेवारी) सकाळी ८.३० वाजता कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले. हे दुःख पचवत आभाळे कुटुंबीय घरी आले. घरी येताच स्व. वामन यांच्या पत्नी सुभद्रा वामन आभाळे (वय ८३) यांचेही निधन झाले.

आयुष्य पतीसोबत घालविले तेच हे जग सोडून गेल्याचा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यामुळे सुभद्रा आभाळे यांनीही पतीपाठोपाठ शुक्रवारी सकाळी प्राण सोडले. वडिलांपाठोपाठ आईच्याही चितेला अग्नि देण्याची दुर्देवी वेळ त्यांचा मुलगा शरद यांच्यावर आली.
आयुष्यभर एकमेकांना साथसंगत केलेले हे पती-पत्नी निळवंडे पंचक्रोशीत आदर्श जोडपे म्हणून परिचित होते. त्यांनी आपल्या मुलांना संस्काराची शिदोरी दिली. मुलगा शरद आभाळे हे भोसरी (पुणे ) येथे उद्योजक असून त्यांनी अनेक संस्थांना सामाजिक बांधिलकीतून आर्थिक मदत दिलेली आहे.
स्व. वामन यांच्यावर निळवंडे येथील प्रवरा तिरी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर पत्नी सुभद्रा यांच्या पार्थिवावर महानुभव पंथानुसार दफनविधी करण्यात आला. त्यांच्या या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तर त्यांची अशी एकमेकांची साथ निभावण्याची पद्धत पाहून अनेकांच्या काळजाचा ठाव घेत आहे.