बरस रे वरुणराजा किती अंत पाहतो!

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी परिसरात वरुणराजा रुसल्याने पिकांची होरफळ होत असून, जवळपास महिनाभरापासून जोरदार पाऊस न झाल्यामुळे जमिनी उन्हाळ्याप्रमाणे भेगाळण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे बळीराजाचे चांगले उत्पन्न घेण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्याचे चित्र आहे. खरिपातील पिकांसह फळबागा अखेरच्या घटका मोजत असून, रडकुंडीला आलेला शेतकरी राजा बरस रे वरुणराजा… किती अंत पाहतो, अशी आर्त हाक देत असल्याचे चित्र शहरटाकळीसह परिसरात आहे.

दहिगाव-ने, शहरटाकळी परिसरात जवळपास संपूर्ण ऑगस्ट महिना अक्षरशः कोरडाठाक गेल्याने आता ऐन मोसमात आलेल्या पिकांनी आता माना टाकण्यास सुरुवात केली आहे. तर अनेक ठिकाणी बाजरी, मका, सोयाबीन मूग, तूर, उडीद,

कपाशी, ही उभी पिके अक्षरशः वाळून जात असल्याचे चित्र असून, उन्हाळा पडल्यासारख्या जमिनीला मोठमोठ्या भेगा पडत असून, त्यामुळे पिके जळून जात आहेत.

गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने परिसरातील खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. कोरडवाहू शेतीतील पिकांनी आता माना टाकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परिसरात सोयाबीन, बाजरीचे पीक अक्षरशः करपू लागले असून,

सध्या कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडत आहेत. मागील काळात झालेल्या रिमझिम पावसामुळे कापूस, बाजरी, मका, तूर, आदी पिके कशीबशी तग धरून आहेत, पण समाधानकारक पाऊस नसल्याने त्यांची वाढ खुंटली आहे. परिसरातील नदी, नाले तहानलेलेच आहेत. तर विहिरी बोरवेलने तळ गाठला आहे.

परिसरात भविष्यात चारा आणि पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे. पावसाअभावी हिरवा चारा उत्पादित करता येत नसल्याने दुधाचे उत्पादन घटत चालले आहे. विशेष म्हणजे परिसरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून,

अनेक गावांत आता काही दिवसात टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागणार, हे निश्चित आहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे शासन आपल्या दारावर ही योजना राबविण्यापेक्षा शासनाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवून पंचनामे करण्याची मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे.

परिसरात एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिके वाळून जाऊ लागली आहेत. सरकारमधील मंत्र्यांनी आमच्या दारी येण्यापेक्षा त्यांनी आमच्या बांधावर यावं अन् आमच्या सोन्यासारख्या पिकाचे काय अवस्था झाली, हे एकदा बघावं. संतोष वाघ, मठाचीवाडी शेतकरी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe