राहुरी : मयत झालेल्या भावाच्या जागेवर दुसरा भाऊ उभा करून जमिनीची विक्री करण्यात आली. सदर घटना ही राहुरी येथे घडली असून जमीन विक्री करणारे, खरेदी घेणारे आणि त्या व्यवहाराला साक्षिदार व ओळख देणाऱ्यांच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सिमा रोहिदास धस, रा. एक्सोटिका प्लॉट नं.५६, सेक्टर उलवे, घाटकोपर, नवी मुंबई या महिलेने सुमारे एक वर्षांपूर्वी राहुरी येथील दुय्यम निबंधक कार्यालय व पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता.
त्या तक्रार अर्जात म्हटले होते की, राहुरी तालूक्यातील पिंप्री अवघड येथील शेत जमिन गट नं. १२७ मधील ०.३३ आर. शेत जमीन ही मयत भानुदास रखमाजी धस यांच्या नावावर होती.भानुदास रखमाजी धस हे दि. ७ जुलै २००५ रोजी नवी मुंबई येथे मवत झालेले असताना सदर जमीन ही त्यांचा भाऊ रामदास रखमाजी धस यांनी भानुदास रखमाजी घस आहे.
असे भासवून दि. ३१ जानेवारी २०११ रोजी राहुरी येथील उपनिबंधक कार्यालयात हजर राहून खरेदी घेणारा ठकसेन नरहरी कांबळे, रा. पिंप्री अवघड, ता. राहुरी याने १ लाख ५० हजार रूपयांत रामदास रखमाजी धस यांच्याकडून या कार्यालयात हजर राहून खरेदी करून दिली.
सदर खरेदीच्या वेळी रामदास रखमाजी धस हेच भानुदास रखमाजी धस आहेत. याबाबत विजय बाळकृष्ण कांबळे तसेच अशोक माधव पिंगळे, दोघे रा. पिंप्री अवघड, ता. राहुरी या दोघांनी ओळख पटवली.
तसेच खरेदी खताच्या वेळी खरेदी खतास साक्षीदार म्हणून विनायक ठकसेन कांबळे, रा. पिंप्री अवघड आणि दुसरे साक्षीदार सुभाष तुकाराम गायकवाड, रा. देवळाली प्रवरा यांनी खरेदी खतावर सह्या केल्या आहेत.
सिमा धस यांनी केलेल्या तक्रार अर्जाची चौकशी झाली.त्या चौकशीत आरोपींनी संगनमत करून मयत भावाच्या ऐवजी जिवंत भाऊ उभा करून खेरदी खत करून शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानूसार उपनिबंधक प्रवीण पोपटराव कणसे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्या फिर्यादीवरून आरोपी ‘ठकसेन नरहरी कांबळे, रामदास सखाहरी धस, विजय बाळकृष्ण कांबळे, अशोक माधवराव पिंगळे, विनायक ठकसेन कांबळे, सुभाष तुकाराम गायकवाड या सहा जणांवर भादंवि कलम ३४, ४२०, ४६७, ४६८, ४७१ प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.