Ahmednagar News : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या नावाखाली भरमसाठ परतावा देण्याच्या आमिषाच्या जाळ्यात अडकलेल्या अनेक गुंतवणूकदारांमध्ये आता चलबिचल सुरू झाली आहे. तसेच संबंधित कंपन्यांकडून पैसे काढून घेण्यासाठी त्यांची पळापळ सुरू असल्याची माहिती समोर येते आहे.
अशा काही कंपन्या ग्रामीण भागातील लोकांना भरमसाठ परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीस भाग पाडतात, अनेक गुंतवणूकदार आता सावध झाले आहेत. ते आता पैसे काढून घेऊ लागले आहेत.

अशा कंपन्यांसाठी पैसा गोळा करणाऱ्या तरुणांकडील आलिशान वाहने, मोबाइलसारख्या महागड्या वस्तू, प्रचंड जंगम मालमत्ता पाहून अनेक युवा मंडळी त्यांच्याकडे पैसे गुंतविण्यास आकर्षित झाली.
या युवकांना हाताशी धरून भरमसाठ परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले गेले आहे. अवघ्या दहा ते बारा महिन्यांत रक्कम दामदुप्पट मिळत असल्याने यामध्ये पैसे गुंतले आहेत.
अनेक ठिकाणी शेअर मार्केट तथा ट्रेडिंगच्या नावाखाली अनेकांची फसवणूक झाली आहे. या प्रकारच्या घटनानंतर फसवणूक झालेले गुंतवणूकदार आता पोलिस ठाण्याचे दार ठोठावत आहेत. त्यानंतर चौकशीला सुरुवात होऊन यंत्रणा कार्यान्वित होत आहेत. तोपर्यंत संबंधित पलायन करत आहेत.
या घटनांमधून गुंतवणूकदार, शासन बोध घेण्यास तयार नाहीत तसेच या घटना थांबत नाहीत. दरम्यान, या टोळ्या गडगंज संपत्ती गोळा करत आहेत. संबंधित पळून गेल्यानंतर, गुंतवणूकदार डब्यात गेल्यावरच तपास यंत्रणा कार्यान्वित होणार का?
असा प्रश्न उपस्थित होत असल्याने अनेक प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, नोकरदार, वर्दीतील मंडळींनी गुंतवणूक केल्याचीही चर्चा आहे. ठिकठिकाणी अशा प्रकारच्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना गंडा घालून पळ काढल्याच्या तसेच अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना ताज्या आहेत.
नुकतेच जामखेड येथेही काही शिक्षकांना अशाच एका कंपनीने कोट्यवधींचा गंडा घातल्याचे समजते. संबंधितांनी पलायन केल्यास गुंतवणूकदारांच्या रकमेचे काय होणार? गुंतवणूकदारांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात रकमा आल्या कोठून? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
याबाबत चौकशीचा समेमिरा मागे लागू नये म्हणून बहुतांशी मंडळींनी ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असे धोरण स्वीकारल्याचे चित्र आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या अशा कंपन्या, संस्था शहरापेक्षा ग्रामीण भागातच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते, भरमसाठ परताव्याच्या अमिषाच्या जाळ्यात ते ग्रामीण भागातील लोकांना अडकवतात व नंतर पळ काढतात.