Ahmednagar News : महापालिकेचे चाललेय काय? कोट्यवधी रुपयांची जागा कवडीमोल भावात देतेय? समोर आलेला ‘तो’ प्रकार धक्कादायक

Published on -

Ahmednagar News : महापालिकेसंदर्भात विविध प्रकार समोर आतापर्यंत आले आहेत. आता आणखी धक्कादायक प्रकार समोर आणला गेला आहे. प्रोफेसर कॉलनी चौकात असणाऱ्या महापालिकेच्या नाट्यगृहाच्या आवारात खुली जागा भाडेतत्त्वावर घेऊन परवानगी पेक्षा चौपट बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनपा अधिकाऱ्यांशी संगणमत करून अत्यंत कमी दरात जागा पदरात पाडून घेतली.

तसेच, बेकायदेशीरपणे जास्त बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा व नियमानुसार करारनामा रद्द करून जागा तत्काळ ताब्यात घ्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे काका शेळके व मनसेचे नितीन भुतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.

या संदर्भात काही दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. नाट्यगृहाच्या पार्किंगच्या आवारात नगररचना विभागाने १५ बाय २० चौरस फुटाच्या चार जागा निश्चित करून दिल्या होत्या. त्या जागा भाड्याने देण्याबाबत मार्केट विभागाकडून प्रक्रिया राबवण्यात आली. यातील तीन जागांबाबत स्थायी समितीने ठराव मंजूर केले आहेत.

तर गणेश पिस्का यांना सर्व प्रक्रिया राबवून जागा उपलब्ध करून देत त्यावर नगररचना विभागाने ३०० चौरस फूट बांधकामाची परवानगी दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात जागेवर १२०० चौरस फूट बांधकाम सुरू आहे. जागेचे दरही अत्यंत अत्यल्प निश्चित करण्यात आले आहेत. मुळात सदर जागेवर सांस्कृतिक वापराचे आरक्षण आहे. त्यावर व्यावसायिक गाळे बांधण्यास परवानगी दिलीच कशी, असा शेळके यांनी उपस्थित केला.

महापालिका कोट्यवधी रुपयांची जागा कवडीमोल भावात देऊन आर्थिक नुकसान करत आहे. अशाच पद्धतीने इतर ठिकाणीही खुल्या जागांवर बांधकामे करण्याची प्रथा सुरू होईल. त्यामुळे महापालिकेने सदरचा बेकायदेशीर प्रकार तत्काळ थांबवावा व बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा.

नियम, अटी शर्तींचे उल्लंघन केल्या प्रकरणी करारनामा रद्द करून जागा तत्काळ ताब्यात घ्यावी, अशी मागणी शेळके व भुतारे यांनी केली आहे. महापालिका आयुक्तांनी हा प्रकार तत्काळ न थांबवल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News