Ahmednagar News : नेहमी जनतेचे वाद विवाद मिटवणाऱ्या पोलिसांनीच आपसात मारामारी केल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली. पोलिस निरीक्षक असताना शेवगाव पोलिस ठाण्याच्या आवारात हा प्रकार घडला.
याबाबत अधिक माहिती अशी , नगर तालुक्यातील शेवगावचे पोलीस ठाणे तसे वेगवेगळ्या कारणांवरून सतत चर्चेत असते. कधी नागरिकांशी, तर कधी आपापसात वाद होण्याचा येथील हा तसा नवीन प्रकार नाही. मात्र आता चक्क पोलिस निरीक्षक असताना पोलिस ठाण्याच्या आवारात दोन पोलिसांत ‘फ्रीस्टाईल’
झाल्याचा प्रकार नुकताच घडला. या बाबत चांगलीच चर्चा रंगली आहे.

शुक्रवारी (दि.५) दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास शेवगाव पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक त्यांच्या दालनात बसलेले होते. तर काही नागरिक तक्रार देण्यासाठी आले होते . मात्र याच दरम्यान पोलिस ठाण्याच्या आवारात गोपनीय शाखा कार्यालयाच्या शेजारील रूममध्ये अचानक गोंधळ व एकमेकांना मारल्याचा आवाज आला.
या आवाजाने येथे तक्रार देण्यास आलेले नागरिक नेमकी काय चाललेय, हे पाहण्यास गेले असता, दोन पोलिसांतच हाणामारी चालू असल्याचे त्यांचे निदर्शनास आले.
यातील एक पोलिस खासगी वेशात, तर एक पोलिस गणवेशात होता. यावेळी तेथे असलेले पोलिस व काही नागरिकांनी ही हाणामारी सोडवली. विशेष म्हणजे या घटनेवेळी खुद्द पोलिस निरीक्षक ठाण्यात हजर होते.
हा प्रकार कोणत्या कारणाने झाला, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, वरिष्ठाकडे एकमेकांच्या चुगल्या केल्या जात असल्याने हा वाद झाल्याची माहिती आहे.
सर्वसामान्य नागरिक त्यांचे वाद विवाद सोडवण्यासाठी ज्या पोलिसांकडे जातात मात्र आज त्याच पोलिसांचेच वाद सामान्य नागरिकांना सोडवावे लागले. ते देखील खुद्द पोलिस निरीक्षक ठाण्यात हजर असताना त्यामुळे याबाबतची चर्चा नागरिक करत होते .