अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 Ahmednagar News :-राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा राखण्यासाठी अनेक संस्था आणि स्वयंसेवक रस्त्यावर पडलेले खराब राष्ट्रध्वज उचलून घेतात. मात्र, ते कोणाकडे जमा करायचे? हा प्रश्न असतो. सरकारी कार्यालयात घेऊन गेले तर टोलवाटोलवी होत असल्याचा अनुभव येतो.
यासंबंधी येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता आता प्रशासनाने यावर स्पष्ट निर्देश दिले आहेत. असे राष्ट्रध्वज संबंधित तहसिलदार कार्यालयात जमा करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

राष्ट्रीय सण-उत्सवांच्या दरम्यान ही समस्या अधिक निर्माण होते. आता एक मे हा महाराष्ट्र दिन जवळ आला आहे. तेव्हा असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी यासंबंधी आवाहन केले आहे.
कार्यक्रमांनंतर राष्ट्रध्वज इतरत्र पडलेले दिसून येतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाची अवहेलना होणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.
नागरिकांनी कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतूदीमध्ये नमूद केल्यानुसारच करावा. खराब झालेले माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावेत.
अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी असे राष्ट्रध्वज तहसिल कार्यालयात सुपूर्द करावेत. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.