अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2022 :- भ्रष्टाचार, अनागोंदी व टोलवाटोलवीने जनतेचे शोषण सुरु असताना सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या
वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीगेट वेस येथे नागरिकांना कॉ. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

तर शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन दि आर्ट ऑफ स्मार्ट गव्हर्नन्स राबविण्याचे आवाहन करुन भ्रष्ट, गुट्टलबाज राजकीय सत्तापेंढारी विरोधात जय शिवाजी, जय डिच्चू कावाची घोषणा दिली.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संघटनेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, अर्शद शेख, हरजितसिंह वधवा, बबलू खोसला, भगवंत तांबे, शाहीर कान्हू सुंबे, सुनिल सकट,
पोपट भोसले, अॅड. सुरेश लगड, अशोक भोसले, विठ्ठल सुरम आदी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देशात भ्रष्टाचार, अनागोंदी टोलवाटोलवी सुरू आहे. लोकप्रतिनिधी आणि नोकरशहा यांनी तमाम जनतेच्या मोठ्या प्रमाणात शोषण सुरू ठेवले आहे.
देशातील भ्रष्टाचाराची गंगोत्री देशातील निवडणुकांमधून सुरू होते. धनदांडगे, गुट्टलबाज सत्तापेंढारी मतदारांची मते राजरोसपणे खरेदी करून आणि जाती-धर्माच्या माध्यमातून मते घेऊन मागच्या दाराने सत्ता मिळतात. केंद्र, राज्य आणि निमसरकारी नोकरशाही पगार हमी योजनेवरील सत्तासूर ठरलेले आहेत.
त्यामुळे देशातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या दि आर्ट ऑफ स्मार्ट गर्व्हनन्सच्या माध्यमातून शासन प्रशासन पद्धतीचा वापर स्वीकारण्याची अत्यंत गरज असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. देशभरातील मतदारांनी उन्नतशिवचेतना असणार्या उमेदवार आणि पक्षाला निवडणुकीत मते दिली पाहिजे.
गुट्टलबाज सत्तापेंढार्याविरुद्ध शिवाजी महाराजांचा डिच्चू कावा वापरून त्यांना सार्वजनिक जीवनातून खड्यासारखे दूर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आली. अॅड. गवळी यांनी भारतातील नोकरशाही आणि न्याय पालिकेतील अधिकार्यांनी टोलवाटोलवी, अनागोंदी केल्याचे आढळून येताच,
अशा लोकसेवकांच्या विरुद्ध डिच्चू कावा खर्या अर्थाने राबविण्याची गरज आहे. भारतीय संविधानातील संसदीय लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्ष याचबरोबर आर्थिक, सामाजिक, राजकीय स्वातंत्र्य या सर्वबाबी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दि आर्ट ऑफ स्मार्ट गर्व्हनन्स तंत्राचा वापर केल्याशिवाय प्रत्यक्षात प्रस्थापित होऊ शकणार नसल्याचे सांगितले.
अशोक सब्बन यांनी देशात खर्या अर्थाने लोककल्याणकारी शासन पद्धती शिवाजी महाराजांनी दिली, त्याचाच देशातील शासन प्रशासनात वापर करण्याची अत्यंत गरज असल्याचे सांगितले.