‘उडीद घेता का कोणी उडीद’…!: उडदाचे भाव ‘इतक्या’ रुपयांनी घसरले; शेतकरी आर्थिक संकटात

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : चालू वर्षी पाऊस वेळेत झाल्याने उडदाचे पीक चांगले आले. मात्र, उडीद काढणीत पाऊस झाल्याने पीक भिजले आहे. अतिवृष्टीत नुकसान झाले व आता अचानक उडदाचे भाव १००० ते १५०० रुपयांनी घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

यंदा जूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उडदाची पेरणी केली. इतरवेळी मात्र तालुक्यात कापूस मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र मागील वर्षी कापसाला भाव न मिळाल्याने यावेळी शेतकऱ्यांनी उडदाला पसंती दिली.

उडदाचा उतारादेखील चांगला मिळाला आहे. कापसाला पर्यायी पीक म्हणून उडदाकडे शेतकरी वळला आहे.मात्र ऐन उडीद काढणीला सुरुवात झाली अन भाव पडले आहेत. भिजलेला उडीद कोणीही खरेदी करायला तयार नाही. शेतकऱ्यांना सर्वच बाजूने अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात उडदाचे पीक घेण्यात आले होते. पाऊसही चांगला झाला आहे. पीक जोमात आले. पीक काढणीत पाऊस लागल्याने शेतकऱ्यांचे हाल झाले. उडीद काढणीला मजूर मिळत नाहीत.

जे भेटतात त्यांना जास्तीचा रोजगार द्यावा लागतो. हे सर्व करुन उडीद बाजारात आणला तर भिजलेला उडीद घेत नाहीत. घेतला तर कवडीमोल भावाने खरेदी केला जातो. सरकारी खरेदी दर तर अतिशय कमी आहे.

उडदाचे बाजार भाव ८००० हजार रुपयांवरुन घसरुन ते थेट ५५०० ते ६५०० रुपयापर्यंत खाली आले आहेत. काही ठिकाणी न भिजलेला उडीद ७००० ते ७४०० पर्यंत घेतला जातो, पण तो अपवादात्मक परिस्थितीत त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे.

सरकारचे यावर कोणतेही बंधन नाही. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्याला मनमानेल तो भाव दिला जातो. गरजवंताला मात्र दिवाळखोरीत निघण्याची वेळ आली आहे. बाजारात उडदाचे भाव नेमके कशामुळे कमी झाले, हे समजायला तयार नाही. शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबली पाहिजे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. पण आता न्याय तरी कोणाकडे मागायचा असा प्रश्न आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe