वन्यजीवांची चारा व पाण्यासाठी भटकंती

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, पारेवाडी, साकेगाव, परिसरात वण्यप्राण्यांना खाण्यासाठी चारा व पिण्यासाठी पाणीच मिळत नसल्याने वन्यप्राणी पाण्या वाचून तडफडत आहेत,

त्यातच पुरेसं खाद्य मिळत नसल्याने प्राण्यांनी आपला मोर्चा नागरी वस्तीकडे वळवला आहे. वन्यप्राण्यांचे हे स्थलांतर धोक्याचे असून, वन्यप्राण्यांसाठी पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

पारेवाडी-पिंपळगाव, साकेगाव, परिसरात वन्यप्राण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने या परिसरात वन्य प्राण्यांसाठी पाणी पिण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ग्रामीण भागात वाढत्या तापमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने जलखोत्रही कोरडे पडले आहेत.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ असल्याने या भागातील वन्यप्राण्यांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. शेतकऱ्यांच्या विहिरी व त्यांच्या कुपनलिका यांना देखील पाणी नसल्याने वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा नागरी वस्तीकडे वळवल्याचे दिसून येत आहे.

सध्या परिस्थितीत पर्जन्यमान कमी झाल्याने नदी-नाल्याचे पाणीदेखील आटल्याचे दिसून येत आहे. या परिसरात हरीण, कोल्हे, लांडगे, तरस व मोरांचे प्रमाण मोठे आहे. रखरखत्या उन्हात घोटभर पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या वन्यप्राण्यांचा विचार करून वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार करून वन्यप्राण्यांची तहान भूक भागवावी, अशी मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे.

वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष लक्ष देऊन पाणवठयाची व्यवस्था करावी. सध्या हे प्राणी शेतकऱ्यांनी शेतात पिकासाठी सोडलेल्या पाण्यावर आपली तहान भागवत आहेत. रात्रीच्या वेळी वन्यप्राणी पाण्याच्या शोधात शेतकऱ्यांच्या घराजवळ किंवा थेट गावात दाखल होत असल्यामुळे वस्तीवर राहणारा शेतकरी भयभीत झाला आहे, त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी वनविभागाने पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

उन्हाचा पारा सहन होत नसल्यान वन्यप्राणी व पशुपक्ष्यांच्या जीवाची लाही लाही होत असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. भटकंती करता करता हे वन्यप्राणी गावात दाखल झाले आहेत. परिसरात सध्या हरिण व मोरांचे प्रमाण जास्त असून, त्यांचे जतन व्हावे, असे ग्रामस्थांना वाटते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe