राज्यातील सर्वच शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अभ्यासक्रम लागू केला जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केल्यानंतर शिक्षण क्षेत्रासह पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व वर्गांसाठी हा अभ्यासक्रम लागू होणार का? असे अनेक प्रश्न पालक उपस्थित करत आहेत. शिक्षणतज्ज्ञ, पालक आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करताना विविध मुद्दे समोर आले.
शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे यांच्या मते, केंद्र सरकारने २०१७ पासून अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes) निश्चित केल्या आहेत. त्यामुळे अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेत त्या विचारात घेतल्या जातील. केंद्र आणि राज्य सरकारच्या अभ्यासक्रमांमध्ये समानता आणण्यासाठी ही योजना राबवली जाण्याची शक्यता आहे. मात्र, CBSE अभ्यासक्रमामुळे राज्य मंडळाच्या तुलनेत अभ्यासक्रमाची कठीण पातळी वाढण्याची शक्यता असल्याने हा बदल सर्वांसाठी सोयीस्कर ठरेल का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

शैक्षणिक वेळापत्रक बदलण्याच्या चर्चेमुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात. राज्यातील ६५ हजारांहून अधिक शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत आहेत. अनेक ठिकाणी शाळांची इमारत मोडकळीस आलेली आहे, काही ठिकाणी फक्त पत्र्याचे छत आहे. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत शाळा चालवणे अधिक कठीण ठरू शकते.
तसेच, एप्रिल-मे महिन्यात यात्रांचे, जत्रांचे, विवाहसोहळ्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे या कालावधीत शाळा सुरू असल्यास विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी राहण्याची शक्यता आहे. परिणामी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल. त्यामुळे वेळापत्रक बदलले तर आरोग्य आणि उपस्थितीचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.
राज्यातील सर्व शाळा CBSE अभ्यासक्रमावर आधारित असतील, याचा नेमका अर्थ काय? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. CBSE अभ्यासक्रम फक्त भाषांतरित केला जाणार की राज्य मंडळाचा अभ्यासक्रम सुधारून CBSEच्या धर्तीवर तयार केला जाणार? विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार का?
अशा प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. अभ्यासक्रम बदलल्यास त्यांचे स्वरूप बदलणार का? आणि हा बदल पालकांना परवडणारा असेल का? याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
CBSE अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल, स्पर्धा परीक्षांसाठी चांगली तयारी होईल, आणि भविष्यात याचा फायदा होईल, असे काही शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड यांच्या मते, CBSE अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. मात्र, हा बदल पालक व शिक्षकांसाठी सहज स्विकारण्यासारखा असेल का? याबाबत साशंकता आहे.
राज्यातील शिक्षणव्यवस्थेतील हा मोठा बदल असल्यानं पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना पुरेशी माहिती मिळणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीबाबत अधिकृत निर्णय घेतला जाईल तेव्हाच सर्व शंका दूर होतील. तोपर्यंत पालक आणि शिक्षकांच्या मनात संभ्रम कायम राहणार आहे.