अहिल्यानगर : आवक कमी असल्याने सुरुवातीला कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला. मात्र, या आठवड्यात कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोमवारी दि. ११ रोजी झालेल्या लिलावात नगरच्या नेप्ती उपबाजारसमितीत एक नंबर कांद्याला ११०० रुपये भाव मिळला असून शेतकऱ्यांचा झालेला खर्चही निघाला नाही. सद्या कांदा निर्यातीवर शासनाने २० टक्के निर्यात शुल्क लवलेले आहेत. हे त्वरीत हटविण्यात यावेत, तसेच यंदा पाऊस कमी झाल्याने उष्णता लवकर वाढली, त्यामुळे कांद्याची फुगवण क्षमता कमी झाली आणि उत्पादनात घट आली. यामुळे बाजारभावात घट येवून शेतकरी अडचणीत सापडला आहे.
नेप्तीच्या उपबाजार समितीत सोमवारी दि. ११ रोजी झालेल्या लिलावात कांद्याचे दर पडले आहेत. या दिवशी गावरान कांद्याची १ लाख ८ हजार ९९४ कांदा गोण्यांची आवक झाली. हा कांदा क्विंटलमध्ये ५९ हजार ९४७ भरला. एक नंबर अति उच्च प्रतिच्या गावकरान कांद्याला १७०० रुपये बाजारभाव मिळाला तर सर्वसामान्य गावरान कांद्याला ११०० ते १५०० रुपये बाजारभाव मिळाला. दोन नंबर प्रतिच्या कांद्याला ८०० ते १०० रुपये बाजारभाव मिळाला. तीन नंबर प्रतिच्या कांद्याला ५०० ते ८०० रुपये बाजारभाव मिळाला आहे. तसेच चार नंबर प्रतिच्या कांद्याला ३०० ते ५०० रुपयांचा बाजार मिळाला. बाजारात कांद्याचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांचा झालेला खर्चही यामध्ये निघाला नाही. कमी प्रतिच्या गावकरान कांद्याला अवघा ३०० रुपये भाव मिळाला. मध्यमप्रतिच्या गावकरान कांद्याला ८०० रुपये दर मिळाला तर उच्चप्रतिच्या गावकरान कांद्याला १५०० रुपये दर मिळाला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

या तुलनेत मगील शनिवारी दि. ८ रोजी झालेल्या कांदा लिलावात उच्च प्रतिच्या कांद्याला २१०० रुपये बाजार भाव मिळाला. हा बाजारभाव समाधानकारक होता. परंतु, त्यानंतरच्या सोमवारी झालेल्या लिलावात २१०० रुपयांवरून कांदा थेट ११०० रुपयांवर येवून थांबला. शनिवारी नेप्ती उपबाजार समितीत ९९ हजार ८२९ कांदा गोण्यांची आवक झाली. यामध्ये एकून ५४ हजार ९०६ क्विंटल कांदा नेप्ती उपबाजार समितीत जमा झाला होता. यावेळी उच्च प्रतिच्या गावरान कांद्याला २३०० रुपये एवढा चांगला बाजार भाव मिळाला होता. शनिवारी झालेल्या कांदा बाजार लिलावात एक नंबर प्रतिच्या कांद्याला १७०० ते २१०० रुपये बाजारभाव मिळाला. दोन नंबर प्रतिच्या कांद्याला १२०० ते १७०० रुपये बाजार भाव मिळाला. तीन नंबर प्रतिच्या कांद्याला ७०० ते १२०० रुपये बाजारभाव मिळाला. तसेच चार नंबर प्रतिच्या कांद्याला ३०० ते ७०० रुपये बाजारभाव मिळाला होता.
यावेळी शेतकरी किमान समाधानी होते. शनिवारी झालेला लिलाव सरासरी शेतकऱ्यांना समाधान देवून गेला. परंतु, सोमवारी झालेल्या कांदा लिलावात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. शनिवारी कमी प्रतिच्या कांद्याला सरासरी ३०० रुपये दर मिळाला तर मध्यम गोल्टी कांद्याला १४०० रुपयांचा बाजारभाव मिळाला. तसेच उच्चप्रतिच्या गावरान कांद्याला २१०० रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला होता. यावर्षी पावसाला उशीराने सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी उशीराने कांदा लागवड केली. सुरुवातीला पाऊस पडल्यावर नगर तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांनी कांदा पेरणी केली होती. हा कांदा लवकर बाजारात उपलब्ध झाला. तसा लागवड केलेला कांदा पेरणी केलेल्या कांद्याच्या अगोदर उगवतो व हाती येतो. परंतु, पावसाने उशीरा हजेरी लावल्याने कांदा लागवडीला यंदा महिना ते दीड महिना उशीर झाला.
त्यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक सुरुवातीला कमी होती. त्यावेळी पेरलेल्या कांद्यालाही बाजारभाव समाधानकारक भेटले होते. यंदा कांद्याला चांगले बाजार मिळतील असे समजून शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन जास्त घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, अनेकांचा कांदा बाजार समितीत दाखल होवू लागल्याने बाजारभाव कमी झाले. एक नंबर कांद्याला अवघा ११०० रुपये बाजार मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना झालेला खर्चही परवडत नाही.