महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये यावर्षी वाढ होईल असे अंदाज व्यक्त केले जात होते. यामध्ये वाढ व्हावी याबाबत बऱ्याचदा चर्चाही झाल्या आहेत. परंतु सध्या प्रशासक राज असल्याने यात वाढ होईल असे म्हटले जात होते. परंतु आता यामध्ये वाढ होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कचरा संकलन शुल्क, अग्निशमन शुल्क व सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदानाच्या भाडेदरात मात्र वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्य शासनाने नगरपालिकांसाठी निश्चित करून दिलेल्या दरानुसार घरातील कचरा संकलनासाठी प्रतिवर्षी २४० ऐवजी ३६० रुपये, तर व्यावसायिक आस्थापनांना वार्षिक ५४० ते १२ हजार रुपये शुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे. महासभेची मान्यता घेऊन शासनाकडे शुल्क वाढीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

यंदाच्या वर्षी महापालिकेत प्रशासक राज असल्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली घरपट्टी व पाणीपट्टीची दर वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, हे दोन्ही महत्त्वाचे कर वगळता उर्वरित सेवा शुल्कात वाढ प्रस्तावित करण्यात आली होती. त्याला प्रशासक जावळे यांनी मंजुरी दिली आहे.
कचरा संकलनासाठी राज्य शासनाने नगरपालिकांसाठी निश्चित केलेले दर मनपाने प्रस्तावित केले आहेत. यात मंगल कार्यालये व मल्टिप्लेक्सच्या शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच, रेकॉर्ड विभाग, अग्निशमन सेवा शुल्कात वाढीलाही मंजुरी देण्यात आली आहे. कचरा टाकणे व इतर दंडाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.
अशी असेल प्रस्तावित शुल्क वाढ
रेकॉर्ड विभाग : नक्कल काढणे ३० ऐवजी ५० रुपये, सावेडी जॉगिंग ट्रॅक भाडे : २ हजार ऐवजी १० हजार, अग्निशमन सेवा : स्टँड बाय ड्युटी – ३ हजार ऐवजी ५ हजार रुपये, ना हरकत दाखला शुल्क : १५०० ऐवजी ३ हजार रुपये.