अकोला: धामणगाव आवारी येथील शेतकरी चंद्रभान रामभाऊ गावंडे यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीचा सातबारा उताऱ्यावरून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात गावंडे यांनी महसूल विभागाकडे तक्रार दाखल केली असून तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
गावंडे यांच्या मालकीची सर्व्हे नंबर ९३/२/१ ही जमीन अचानक सातबारा उताऱ्यावरून गायब झाली आहे. त्यामुळे त्यांनी महसूल विभागाकडे धाव घेतली. “माझी वडिलोपार्जित जमीन महसूल दप्तरातून गायब कशी झाली?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

गावंडे यांचे प्रकरण समोर आल्यानंतर धामणगाव आवारी येथील इतर शेतकरीही आपल्या जमिनींच्या नोंदीबाबत साशंक झाले आहेत. आपल्या जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर नावे कायम आहेत का? याची खात्री करण्यासाठी त्यांनी महसूल कार्यालयात चौकशी सुरू केली आहे.
१० मार्च रोजी गावंडे यांनी तहसीलदार डॉ. मोरे यांच्याकडे विनंती अर्ज दिला. ११ मार्च रोजी त्यांनी पुन्हा भेट घेऊन “माझ्या जमिनीचा सातबारा उताऱ्यावरून गायब झाल्याचा तपास लावून ती माझ्या नावावर पूर्ववत करण्यात यावी,” अशी मागणी केली. मात्र, अद्याप त्यांना समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.
तहसीलदार मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गावंडे यांच्या नावावरील जमीन १९८५ च्या जमिनीच्या वाटपात कमी झालेली दिसत आहे. मात्र, मूळ मालकाच्या नावावरून जमीन गायब कशी झाली, याबाबत तपशील स्पष्ट नाही. तक्रारीची सत्यता तपासून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील करता येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रकरणाची महसूल विभागाकडून चौकशी सुरू असून लवकरच अहवाल मिळेल. मात्र, शेतकरी चंद्रभान गावंडे आणि इतर जमीनधारकांच्या मनात अजूनही अस्वस्थता आहे. ही जमीन परत मिळेल की नाही? आणि जर जमिनीचे नोंदवहीत चुकीच्या पद्धतीने बदल करण्यात आले असतील, तर त्याला जबाबदार कोण? हे प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत.