Ahmednagar News : अहमदनग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ५६४ शाळा असून, यातील १६१ शाळांमध्ये १० पेक्षा कमी पट आहे, तर ६१२ शाळा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. जिल्ह्यात १ ते १० पटसंख्या असणाऱ्या सर्वाधिक ४० शाळा अकोले तालुक्यात,
२० शाळा पाथर्डीत, २० संगमनेरात, १२ शेवगावमध्ये, तर १३ श्रीगोंदा तालुक्यात आहेत. या जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. राज्यातील तब्बल १५ हजार जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी झाल्याचे मागील आठ महिन्यांपूर्वीच्या आकडेवरून स्पष्ट झाले होते,
त्यामुळे अशा शाळा बंद करून तेथील विद्यार्थी शेजारच्या शाळेत वर्ग करण्याचे, तसेच शिक्षकांचे इतर शाळांत समायोजन करण्याच्या दृष्टीने वर्षभरापूर्वी शासनाने माहिती मागवली होती. मात्र, त्यास विरोध झाल्याने तुर्तास शासनाने कमी पटसंख्येच्या शाळा बंद केलेल्या नाहीत.
एकीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थी मराठी माध्यमाकडे वळत असताना दुसरीकडे जिल्ह्यातील १६२ शाळांत १० पेक्षाही कमी विद्यार्थी संख्या असल्यामुळे या शाळांवर बंदची टांगती तलवार आहे. शेवगाव तालुक्यातील १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा: कोजागिरी वस्ती, शेलार वस्ती, हगे वस्ती, जय अंबिका वस्ती, शेकटे खुर्द, चिकणी तांडा व आदर्शनगर या शाळांचा समावेश आहे.