‘त्या’ जबाबदार लोकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होतील का?

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर शहरातल्या महामार्गावर पुन्हा एक बळी गेलाय. शासकीय यंत्रणेला अजून किती अपघाती मृत्यू हवे आहेत? ज्या यंत्रणेतल्या जबाबदार लोकांमुळे हे असे जीव जात आहेत, त्या सर्वच लोकांच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का? अश्विनीताई धनंजय भंडारे यांचं अपघाती निधन ही दुर्दैवी घटनाच मन सुन्न करणारी आहे.

मानव संपत्ती ही देशाची संपत्ती असते आणि अचानकपणे या संपत्तीचा नाश होणे म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान आहे. परंतु या नुकसानीला जे जबाबदार आहेत, त्यांच्याविरुध्द कुठेही गुन्हे दाखल होत नाहीत. ते मोकाटपणे उंच मानाने गाड्यात फिरताना दिसताहेत. या लोकांवर सदोष मनुष्यवधाचा खटला किंवा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये? अहमदनगर शहरातून चांदणी चौक ते कोठला बसस्थानक (हे बसस्थानकही अखेरच्या घटका मोजतंय.) या रस्त्याने आत्तापर्यंत अनेक जीव घेतलेले आहेत.

दर वर्षाला या रस्त्यावर अनेक अपघात होतात. परंतु दोन ते तीन वर्षांमध्ये बदलून येणाऱ्या अधिकाऱ्यांना याच्याशी काय घेणं देणं? अहमदनगर शहरात उड्डाणपूल व्हावा, याकरिता दीड दशक उलटून जातं. परंतु त्यातदेखील कासवाची चाल दिसून येते. आज याच झोपेचे सोंग घेणाऱ्या या यंत्रणेने अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी एमडी कै. यशवंतराव भंडारे यांच्या स्नुषा आणि अहमदनगर जिल्हा एम्प्लॉईज युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांच्या पत्नी अश्विनी धनंजय भंडारे यांचा बळी घेतला.

नेहमप्रमाणेच सकाळी चांदबीबी महाल येथे फिरायला जाण्याचा त्यांचा अनेक वर्षांपासूनचा नियम आहे. स्टेट बँक येथून सर्वजण आपापली दुचाकी वाहने लावून एकत्र महलाकडे जात असत. सकाळी फुलसौंदर मळा येथील आपल्या घरातून चांदबीबी महल येथे जाताना अहमदनगर येथील स्टेट बँक चौकात हा अपघात झाला . अश्विनीताई भंडारे या अहमदनगर शहरांमध्ये विविध क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांनी अहमदनगर लायन्स क्लब, योगा, महिला फिटनेस क्लब तसेच अनेक सामाजिक संस्थावर काम केलेले आहे.

सामाजिक कार्यात त्या नेहमीच अग्रेसर असत. फक्त महिलांसाठी त्यांनी तयार केलेली जीम हीदेखील एक विशेष उल्लेखनीय बाब आहे. लायन्स क्लबच्या माध्यमातून महिलांसाठी अश्विनीताईंनी केलेलं कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. लायनेसचे प्रांतपालपदही त्यांनी यशस्वी सांभाळले आहे. चांदणी चौक ते जी पी ओ. या वळणावर रस्त्याचे ‘बँकिंग’ चुकीचे असल्याने गाड्या स्लिप होतात. किंवा त्यांचा बॅलन्स जातो आणि अपघात होतात. आज अशाच एका अपघातात अश्विनी धनंजय भंडारे यांचा या रस्त्यावर अपघात होऊन जागेवर मृत्यू झाला.

भरधाव वेगातील मोठी गाडी किंवा कंटेनर किंवा ट्रक त्यांच्या अंगावरून गेला आणि संबंधित वाहनचालक थांबलादेखील नाही, हे त्याहून संतापजनक म्हणावं लागेल. (लोकांनी त्याला थांबवलं असतं, पण पहाटे रस्त्यावर खूपच कमी वर्दळ होती.) किमान अर्धा तास त्याठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात त्या पडून होत्या. शहरात अपघात होऊनही कोणाला याची माहिती न मिळणे, हे शासकीय यंत्रणेचं अपयश आहे. ज्या ज्या वेळेस चांदणी चौक रस्त्यावर अपघात होतो, तेथे एक तर आंदोलन होते, सरकारी यंत्रणा आश्वासन देते आणि पुन्हा काही दिवसांतच पहिले पाढे पंचावन्न…

याठिकाणी घरातील एका महिलेने आपला प्राण गमावले आहेत. कारण एकच, त्याठिकाणी रस्त्याची बँकिंग व्यवस्थित झालेलं नाही. यासंदर्भाततले अहवाल अनेक वर्षापूर्वी देण्यात आले. परंतु त्यावर काहीही हालचाल झालेली नाही. हा महामार्ग शहराला जोडणारा असतानादेखील सिग्नल सकाळी बंद असतात आणि भरधाव वेगाने येणारे कंटेनर किंवा अवजड वाहन अपघात करुन मध्य शहरातून बिनधास्तपणे निघून जाते, मग प्रश्न हा उरतो, की नक्की हा गुन्हा कोणाचा? त्या गुन्हेगारांविरुद्ध कदाचित शासन दरबारी शिक्षा होणार नाही, परंतु ज्या लोकांच्या चुकीमुळे सदर प्रकार घडत आहेत, जर देव त्यांना शिक्षा देईल तर त्यांच्या लक्षात येईल,

थोड्याशा पैशांकरिता दुसऱ्यांच्या प्राणांचे बळी देणाऱ्या या झोपलेल्या राजकारणी, अधिकारी, शासन कर्मचारी तिथे फूटपाथवर ठान मांडून वर्षानुवर्षे असलेले अनधिकृत धंदे आणि त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन अपघाताला आमंत्रण देणाऱ्या या गोष्टींना आपण आळा कसे घालणार? पुन्हा एकच, झोपेचे सोंग घेणाऱ्या या यंत्रणेमधील चुका करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध एकदा तरी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का? या रस्त्याच्या या वळणावर चुकीची बँकिंग असलेल्या

या रस्त्याबदल देण्यात आलेल्या अहवालावर अभ्यास करुन कारवाई करुन ते वळण व्यवस्थित करण्यात येईल का? ज्यामुळे यापुढे अश्विनीताई सारख्या कर्तृत्ववान महिलेचे किंवा कोणाच्या घराचे ‘दीपक’ असे विझणार नाही, याची काळजी घेण्यात येईल का? त्यांच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होतील का?

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News