अहिल्यानगर : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, त्या प्रतितोळा एक लाख रुपयांपर्यंत पोहोचल्या होत्या. नंतर मात्र चार हजार रुपयांची घसरण होऊन सोन्याचा दर ९५,५०० रुपये प्रतितोळा झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांना नवीन सोने खरेदी करणे परवडत नसल्याने, अनेकजण घरातील जुन्या सोन्याचा वापर करून नवे दागिने बनवत आहेत. सण, उत्सव आणि लग्नसराईत जुन्या सोन्याला मोड देऊन नवे दागिने तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे.
सोन्याच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
काही वर्षांपूर्वी सोने खरेदी करणे सर्वसामान्यांसाठी सोपे होते. मात्र, आता सोन्याचा दर एक लाख रुपये प्रतितोळ्यापर्यंत गेल्याने सामान्य ग्राहकांसाठी ते खरेदी करणे कठीण झाले आहे. चार दिवसांपूर्वी सोन्याचा दर ९९,५०० रुपये होता, परंतु मंगळवारी तो ९५,५०० रुपयांवर आला. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि आर्थिक घडामोडी यांचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होत आहे. असे असले तरी, उद्योजक, बागायतदार आणि श्रीमंत व्यक्ती अजूनही सोने आणि दागिने खरेदी करत असल्याने सराफा बाजारात चांगली उलाढाल दिसून येत आहे. परंतु, सर्वसामान्य ग्राहकांना वाढत्या किमती परवडत नसल्याचे चित्र आहे.

जुन्या सोन्याचा वापर वाढला
सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे ग्रामीण भागातील नागरिक नवीन सोने खरेदी करण्याऐवजी जुन्या सोन्याचा वापर करत आहेत. घरातील जुने दागिने मोडून त्यापासून नवे दागिने बनवण्यावर अनेकांचा भर आहे. यामुळे खर्च कमी होतो आणि सण-उत्सव तसेच लग्नकार्य साजरी करण्यासाठी आर्थिक बोजा कमी होतो. विशेषतः ग्रामीण भागात नवीन सोने खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या अवघड झाले आहे. त्यामुळे जुन्या सोन्याला नवे रूप देऊन हौस पूर्ण करण्याचा मार्ग अनेकजण निवडत आहेत.
कमी वजनाच्या दागिन्यांना पसंती
सोन्याच्या किमतींमधील सततची वाढ लक्षात घेता, अनेक तरुण-तरुणी कमी वजनाचे आणि कमी किमतीचे सोन्याचे दागिने खरेदी करत आहेत. सोन्याची हौस असली तरी वाढत्या दरांमुळे पूर्णवजनाचे दागिने घेणे परवडत नाही. त्यामुळे हलक्या वजनाचे, आकर्षक डिझाइनचे दागिने घालण्याकडे कल वाढला आहे. विशेषतः तरुण पिढी कमी खर्चात स्टायलिश दागिने घालण्याला प्राधान्य देत आहे. यामुळे सराफा बाजारात कमी वजनाच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे.