नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत नेमकी कोणाला, याचा फैसला झालेला नाही. या जागेवर शिवसेना व काँग्रेस सातत्याने दावा करीत आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी पवार यांनी कामाला लागण्याच्या सूचना ठाकरे गटाच्या कार्यकत्यांना दिल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत नगर शहराची जागा शिवसेनेला सोडण्यात येईल अशी चर्चा रंगली आहे.
पुणे येथील मोदी बागेत शरद पवार यांची शिवसेना ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे प्रदेश सहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव आणि मंदार मुळे यांनी भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश कानडे, शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.

नगर शहर विधानसभा मतदारसंघातील सद्य राजकीय स्थितीवर यावेळी चर्चा झाली. राठोड यांनी या मतदारसंघातील स्थिती मांडली. नगर शहरातील राजकीय हालचाली मांडल्यानंतर, पवार यांनी कामाला लागा, अशा सूचना केल्याचे राठोड यांनी सांगितले.
नगर शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दिवंगत उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांचे भरीव काम आहे. त्यांची पुण्याई तुमच्या पाठीशी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा तुम्ही पुढे न्या. मी आहेच तुमच्याबरोबर, नगर विधानसभेच्या जागेसंदर्भात शिवसेनेच्या वरिष्ठांशी माझी चर्चा सुरू आहे, असे पवार यांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते उत्साहात असल्याचे दिसून आले. पवार यांचे हे विधान म्हणजे, शिवसेना ठाकरे गटाच्या नगरमधील पदाधिकाऱ्यांना विधानसभेसाठी आशीर्वाद आहेत, असे राठोड, जाधव यांनी म्हटले आहे. पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जा, असा सल्लाही पवार यांनी दिल्याचा दावा राठोड यांनी केला.
नगर शहरासाठी काँग्रेस आग्रही
एकेकाळी नगर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यामुळे नगर शहराची जागा काँग्रेसलाच मिळावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे काँग्रेस वरिष्ठांकडे करीत आहेत.
नगरमधील एका कार्यक्रमात माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनीही नगरमधून काँग्रेसचाच आमदार होईल, असे वक्तव्य केले होते. मात्र, आता पवार यांनी शिवसेनेला आशिर्वाद दिल्याचे सांगत शिवसेनेही या जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे या जागेवरुन महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.