Ahmednagar News : राहत्या घरात गांजा विक्री करणाऱ्या राहाता येथील एका महिलेस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून तिच्या ताब्यातील ४ किलो १५० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार पोनि. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात तसेच अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे,
गणेश भिंगारदे, संतोष खैरे, अमृत आढाव, भाग्यश्री भिटे व उमाकांत गावडे यांचे जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना सपोनि. हेमंत थोरात यांना मड्डो सलीम शेख (रा. एकरुखे रोड, ता. राहाता) ही महिला तिच्या राहत्या घरात गांजाचा साठा करून त्याची विक्री करत असल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली.
त्यानुसार पथकाने राहाता पोलिस स्टेशनचे पोनि. सोपान काकडे व कर्मचाऱ्यांसह एकरुखे रोड येथील छापा टाकला असता येथे एक महिला दिवाणवर बसलेली दिसली. पथकाने तिचे नाव गांव विचारले असता तिने तिचे नाव मड्डो सलीम शेख (वय ४४, रा. एकरुखे रोड, ता. राहाता) असे असल्याचे सांगितले.
तिच्या घराची झडती घेतली असता घरातील दिवाणमध्ये पांढऱ्या रंगाच्या गोणीत उग्र वास येत असलेला ओलसर पदार्थ बिया बोंडे, काड्या, पाने व संलग्न असलेला पाला असा हिरवे रंगाचा ४ किलो १५० ग्रॅम वजनाचा व ४१ हजार २०० रूपयांचा गांजा मिळुन आला.
तो विक्रीसाठी आणल्याचे सांगितल्याने महिला मड्डो सलीम शेख हिला ताब्यात घेतले. सफौ/दत्तात्रय तानाजी हिंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहाता पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिरीष वमने यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.