Surat Chennai Expressway : अहिल्यानगरमधून जाणाऱ्या सुरत चेन्नई या महामार्गाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार असल्याची माहिती खा. नीलेश लंके यांनी बुधवारी दिली. या महामार्गासंदर्भात खा. लंके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
मंत्री गडकरी व खा. लंके यांच्या भेटीमध्ये जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत-चेन्नई महामार्ग प्रकल्पातील अडथळयांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर गडकरी यांनी सदर प्रकल्पासंदर्भातील प्रलंबित निर्णय येत्या एक महिन्यात घेण्यात येईल व प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

अहिल्यानगर जिल्हा हा साखर, सिमेंट व खत उद्योगांमुळे औद्योगिक दृष्टीकोनातून महत्वाचा असून हा महामार्ग जिल्हयाच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारा ठरेल असा विश्वास खा. लंके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

राहुरी, देहेरे नगर बायपास चौकात अंडर पास हवा
खा. लंके यांनी यावेळी मंत्री गडकरी यांना अहिल्यानगर-शिड-सावळीविहीर या महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गासंदर्भातही निवेदन सादर केले. राहुरी शहरात उडडाणपुल अथवा अंडपास मंजुर करावा, देहरे आणि नगर बायपास चौकात अंडर पास उभारण्याचीही मागणी खा. लंके यांनी केली.
या मार्गावर शाळा, कॉलेज, व्यापारी वसाहती आणि साखर कारखान्यांमुळे मोठया प्रमाणावर रहदारी असून अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे प्रकल्प अत्यंत गरजेचे असल्याचे लंके यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. खा. लंके यांच्या या मागणीवर मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सबंधित विभागांकडून सविस्तर अहवाल मागविण्याचे आदेश दिले.
विश्वासाचे आणि सुसंवादाचे नाते
मंत्री नितीन गडकरी आणि खासदार नीलेश लंके यांच्यात एकमेकांप्रती परस्पर विश्वासाचे व सुसंवादाचे अतूट नाते असून दोघेही विकासकामांबाबत अत्यंत सकारात्मक आणि कृतीशील आहेत. या कामासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर आवष्यक ती सर्व मदत केली जाईल अशी ग्वाही मंत्री गडकरी यांनी यावेळी दिली.