कर्जत- शहरात संत सद्गुरू गोदड महाराज क्रीडानगरीत बुधवारपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू झालाय. मागील काही वर्षांपासून कुस्तीप्रेमींसाठी ही स्पर्धा एक उत्सव बनली आहे.
यंदाही मल्लांनी आपल्या कसलेल्या कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकलीत. बुधवार, २६ मार्चपासून कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालयासमोरील मैदानात ६६ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात झाली.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आमदार रोहित पवार मित्रमंडळ कर्जत-जामखेड यांनी मिळून ही स्पर्धा आयोजित केली आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या मल्लांनी आपली ताकद आणि चपळता दाखवत मैदान गाजवलं.
पहिल्या दोन दिवसांत, म्हणजे बुधवार आणि गुरुवारला, ५७, ६५, ७४, ६१ आणि ८६ ते १२५ किलो वजनी गटात कुस्त्या रंगल्या.
कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नांदेड, मुंबई, पुणे, नागपूर, धाराशिव, सोलापूर, बीड या जिल्ह्यांतून आलेल्या नामांकित मल्लांनी आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली आणि पुढच्या फेरीत स्थान मिळवलं.
या लढतींमध्ये प्रेक्षकांना उत्कंठा वाढवणारे क्षण पाहायला मिळाले. विशेषतः ६१ किलो वजनी गटात चुरस पाहायला मिळाली. अंतिम सामन्यात कोल्हापूरचा प्रवीण वडगावकर आणि साताऱ्याचा विशाल रूपनवर यांच्यात झुंज झाली.
विशालने जबरदस्त खेळ करत १४ गुण मिळवले आणि बाजी मारली. माती विभागात पुण्याच्या आविष्कार गावडेनं कोल्हापूरच्या सतीश कुंभारवर ८ गुणांसह विजय मिळवला.
तिसऱ्या दिवशी, म्हणजे शुक्रवारी, सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रांत ७०, ७९ आणि ९२ किलो वजनी गटात गादी आणि माती विभागात कुस्त्या झाल्या.
७० किलो गटात साई म्हात्रे (कल्याण), दीपक देवकर (नाशिक), किरण ढवळे (रायगड), दीपक चोरमले (छत्रपती संभाजीनगर), प्रणव जाधव (लातूर), पृथ्वीराज रसाळे (सांगली), साहिल कंठे (सातारा), ऋषिकेश पवार (सोलापूर) आणि कुलदीप पाटील (कोल्हापूर) यांनी आपल्या खेळानं मैदानावर छाप पाडली.
७९ किलो गटात विनायक शेंडगे (पुणे), राहुल कोरडे (सातारा), प्रणव हांडे (सोलापूर), शिवराज झाजुरणे (नांदेड), पृथ्वीराज वाडकर (मुंबई), गणेश झाजुरणे (ठाणे), नाथा पवार (सांगली), धुलाजी हरकर (धाराशिव), पातन चौधरी (ठाणे), अक्षय साळवी (कोल्हापूर), रामेश्वर वाघ (बुलढाणा) यांनी आपलं वर्चस्व दाखवलं.
९२ किलो गटाच्या कुस्त्या रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या, ज्यामुळे प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला.
या स्पर्धेसाठी एकूण ४५ संघांपैकी ४३ संघ कर्जतमध्ये दाखल झालेत. जवळपास ८०० मल्लांनी या मैदानात आपली नावं नोंदवली आहेत. स्पर्धेचा शेवटचा दिवस, म्हणजे रविवार, ३० मार्च हा खास ठरणार आहे.
या दिवशी महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत होईल. गादी आणि माती विभागातील उपांत्य फेरीतले विजेते मल्ल या सामन्यात आमनेसामने येतील.
हा सामना पाहण्यासाठी ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेची रंगत आणखी वाढणार आहे. कुस्तीप्रेमींसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, यात शंका नाही.