कर्जत-जामखेड मतदारसंघात प्रथमच होणाऱ्या ६६ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेची जोरदार तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आयोजित ही स्पर्धा २६ ते ३० मार्च २०२५ दरम्यान कर्जत येथे रंगणार असून, आमदार रोहित पवार मित्र परिवार आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कुस्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यभरातील कुस्तीप्रेमींसाठी ही स्पर्धा एक पर्वणी ठरणार असून, आयोजकांनी या स्पर्धेला अभूतपूर्व स्वरूप देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.
स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. या स्टेडियममध्ये अत्याधुनिक सुविधांचा समावेश असून, कुस्तीला जागतिक स्तरावर नेण्याच्या दृष्टीने ही पायवाट ठरेल, अशी अपेक्षा आहे. सुमारे ९०० हून अधिक नामांकित मल्ल या स्पर्धेत आपले कसब आजमावणार आहेत. आयोजकांनी स्पष्ट केले आहे की, कोणत्याही मल्लावर अन्याय होणार नाही आणि निर्णय प्रक्रिया पारदर्शक राहील यासाठी विशेष काळजी घेतली जाईल. यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच नेमण्यात आले असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चुका टाळण्यावर भर देण्यात येत आहे. राजकीय हस्तक्षेप टाळून गुणवत्तेच्या आधारेच विजेता ठरेल, अशी ग्वाही आयोजकांनी दिली आहे.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ‘महाराष्ट्र केसरी’ ची मानाची गदा पटकावलेले सर्व माजी विजेते या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. तसेच, ४० वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आणि कुस्ती क्षेत्राला नवी दिशा देणारे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची समारोप सोहळ्याला विशेष उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेची सांगता भव्य स्वरूपात होईल, अशी अपेक्षा आहे.
स्पर्धेचा प्रमुख उद्देश कुस्तीला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा प्रदान करणे आणि मल्लांना योग्य प्रशिक्षण तसेच संधी उपलब्ध करून देणे हा आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधांची पूर्तता करण्यात आली आहे. राज्यभरातून आणि देशभरातून कुस्तीप्रेमी या ऐतिहासिक स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी कर्जतमध्ये दाखल होतील, यासाठी त्यांच्यासाठी उत्तम बैठक व्यवस्थेसह सर्व सोयींची काळजी घेण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ च्या इतिहासात ही स्पर्धा एक मैलाचा दगड ठरावी, यासाठी आयोजकांचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले असून, कुस्तीप्रेमींसाठी हा महासंग्राम अविस्मरणीय ठरण्याची शक्यता आहे.